रत्नागिरी : रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठीच्या पहिल्याच ‘लघु न्यायसहायक वैज्ञानिक प्रगोशाळा’ (फाॅरेन्सीक लॅब) चे उद्घाटन शुक्रवारी रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रविंद्र वायकर यांच्या करण्यात आले. या प्रयोगशाळेच्या उद्घाटनप्रसंगी खासदार विनायक राऊत, आमदार उदय सामंत, नगराध्यक्ष बंड्या साळवी, जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, न्यायिक व तांत्रिक महासंचालक हेमंत नगराळे, जिल्हा पोलिस अधिक्षक प्रविण मुंढे, न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाचे संचालक डॉ. कृ.वि.कुलकर्णी आदी अधिकारी उपस्थित होते..
अलिकडच्या काळामध्ये गुन्हेगारांकडून गुन्हे करताना अत्याधुनिक सामुग्री व पद्धतीचा वापर करण्यात येतो. त्या प्रवृत्तीना विफल करण्यासाठी दाखल झालेल्या मुद्देमालावर रासायनिक विश्लेषण करुन सामाजिक दृष्टीकोनातून तपास यंत्रणांना आणि पर्यायाने न्यायदान यंत्रणेला महत्वाची वैज्ञानिक पुरावा वेळेवर उपलब्ध करुन देण्यासाठी अशा फाॅरेन्सीक लॅब महत्वाची भूमिका बजावत असतात. वैज्ञानिक प्रयोगशाळांमध्ये समाजात घडणार्या निरनिराळ्या गुन्ह्यांमधील जप्त मुद्देमालावर शास्त्रीय पद्धतीने विश्लेषणाचे कार्य केले जाते.
सद्यस्थितीत मुंबई येथे मुख्य प्रयोगशाळा असून नागपुर, पुणे, औरंगाबाद, नाशिक, अमरावती, नांदेड, कोल्हापूर अशा ७ प्रयोगशाळा कार्यारत आहे. २४ जानेवारी २०१८ च्या शासन निर्णयानुसार ठाणे, रत्नागिरी, चंद्रपुर, सोलापुर व धुळे या ५ लघु प्रयोगशाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार चंद्रपुर येथील प्रयोगशाळा सुरू झाली असून रत्नागिरी व सिंधुदुर्गसाठीची प्रयोगशाळा सुरू झाली. या अगोदर या दोन्ही जिल्हयातील गुन्ह्यातील मुद्देमाल पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येत होता. ही न्यायशाळा सुरू होताच विषशास्त्र व जिवशास्त्र विभागाच्या मुद्देमालाची तपासणी या ठिकाणी करणे शक्य होणार आहे.