
रत्नागिरी, (आरकेजी) : रत्नागिरी येथे शिवसेनेमध्ये संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. संपर्क प्रमुख विजय कदम आणि सचिव खासदार विनायक राऊत यांनी जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची नुकतीच घोषणा केली. यामध्ये अनुभवी पदाधिकाऱ्यांना बढती देण्यात आली आहे. चिपळूणचे प्रतापराव शिंदे यांची चिपळूण तालुका प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रत्नागिरीनगरपरिषदेचे विद्यमान उपनगराध्यक्ष राजेश सावंत यांच्यावर रत्नागिरी ग्रामीण विभागाच्या उपजिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर रत्नागिरी शहर उपजिल्हा प्रमुखपदी संजय साळवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
रत्नागिरी तालुक्याच्या उपतालुकाप्रमुखपदी दोन नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. शिवसेनेचे जुने कार्यकर्ते शेखर घोसाळे आणी प्रवीण पांचाळ यांच्यावर उपतालुकाप्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. गेली अनेक वर्षे रत्नागिरी शहर प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळणारे प्रमोद शेरे यांना पक्षाने बढती दिली आहे. त्यांच्यावर रत्नागिरी विधानसभा कार्यक्षेत्राच्या संघटकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. प्रमोद शेरे यांच्या जागी शहर प्रमुख म्हणून बिपीन बंदरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपमधून शिवसेनेत आलेले संजय पुनसकर यांच्यावर रत्नागिरी शहर संघटक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
विभागप्रमुखांच्याही नियुक्त्या करण्यात आल्या असून त्यामध्ये हातखंबा गटासाठी सचिन उर्फ तात्या सावंत, करबुडे गटासाठी आप्पा घाणेकर तर शिरगाव गटासाठी मयू पाटील यांना जबाबदारी देण्यात आली आहे. तर फणसोप गणाकरता नंदा मुरकर आणि देऊड गणाकरता बाब्या साळवी यांच्यावरती उपविभागप्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.