रत्नागिरी, (आरकेजी): आषाढी आमावस्येच्या उधाणानं कोकण किनारपट्टीवर दाणादाण उडवून दिली आहे. अजस्त्र लाटांचं तांडव सध्या रत्नागिरीच्या किनारपट्टीवर पहायला मिळत आहे. अजस्त्र लाटांनी सध्या मिऱ्या, आलावा, पंधरामाड आणि मुरुगवाडा गावाला जोडणाऱ्या धुपप्रतिबंधक बंधाऱ्याला भलेमोठे भगदाड पडलं आहे. त्यामुळे या भागतील नागरिक भीतीच्या छायेत जगत आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून उधाणाला सुरुवात झाली आहे. त्यात शनिवारी अमावस्येला सुरुवात झाली होती. अमावस्येच्या काळात समुद्राला मोठी भरती येते. त्यामुळे रविवारी उधणाची तीव्रता वाढली होती. सध्या धुपप्रतिबंधक बंधाऱ्यावरून अजस्त्र लाटा मानवीवस्तीपर्यत पोहचत आहेत. त्यामुळे पंधरामाड परिसरातला धुपप्रतीबंधक बंधारा ढासळला आहे. ठिकठिकाणी या बंधाऱ्याला भगदाड पडलं आहे. अजस्त्र लाटांच्या वेगाने या बंधाऱ्याची पुरती वाताहत झाली आहे. बंधाऱ्याचे काही दगड तर वाहून गेले आहेत. बंधाऱ्याला भगदाड पडल्यानं किनाऱ्यालगतची दोन माडाची झाडे समुद्रानी गिळंकृत केली आहेत. आज जवळपास चार ते साडेचार मिटर उंचीच्या लाटा सध्या समुद्रकिनारी पाहण्यास मिळत आहेत. यामुळे जाकिमाऱ्या, भाटिमिऱ्या आणि पंधरामाड परिसरातल्या २५ घरांना या उधाणामुळे धोका निर्माण झाला आहे. आज इथल्या परिस्थितीची पाहणी तहसीलदारांनी केली. आज देखील उधाणाचा जोर असणार आहे. त्यामुळे इथले ग्रामस्थ भीतीच्या सावटाखाली आहेत.