रत्नागिरी :सातबारा उताऱ्यावर असलेल्या परशुराम देवस्थानच्या नावामुळे पेढे, परशुराम या दोन गावांतील जनतेला अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं आहे. घर बांधता येत नाही, बँक कर्ज देत नाही, प्रकल्पग्रस्तांना या वादामुळे नोकरी मिळत नाही, अशा अनंत अडचणींना सामोरं जावं लागतं. त्यामुळे सातबारा कोरा व्हावा, संपादित जमिनीचा 100 टक्के मोबदला कुळांना मिळावा या आपल्या मागणीसाठी या दोन्ही गावांतील जनतेने प्रांत कार्यालयावर आज जनआक्रोश मोर्चा काढला. परशुराम देवस्थानपासून या मोर्चाला सुरुवात झाली. आणि बाजापेठेतून हा मोर्चा प्रांत कार्यालयावर धडकला. जवळपास चार हजार गावकरी या जनआक्रोश मोर्चात सहभागी झाले होते. देवस्थान इनामप्रश्नी अनेकदा इथल्या गावकऱ्यांनी अनेकदा आवाज उठवला. मात्र आजपर्यंत त्यांच्या या प्रश्नाकडे कुणी लक्षच दिलं नाही. त्यामुळे संघर्ष समितीने आंदोलनात्मक आणि न्यायालयीन लढा सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. माझा देश स्वतंत्र झाला, मी स्वतंत्र कधी होणार, जमीन आमच्या हक्काची नाही नाही कुणाच्या बापाची, आमचा लढा हक्कासाठी नाही कुठल्या स्वार्थासाठी, आमच्या देवाच्या आडून आमच्यावर केलात अन्याय तर याद राख, देवस्थान ट्रस्ट चले जाव अशा घोषणांनी चिपळूणची बाजारपेठ दुमदुमून गेली होती. या मोर्चात चार हजारांहून अधिक ग्रामस्थ सहभागी झाले होते. तसेच आमदार शिवसेना आमदार सदानंद चव्हाण, राष्ट्रवादीचे दापोलीचे आमदार संजय कदम, खेडचे नगराध्यक्ष आणि मनसे नेते वैभव खेडेकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम, शिवसेना जिल्हाध्यक्ष सचिन कदम यांच्यासह विविध नेते, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
दरम्यान येत्या पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न मार्गी न लागल्यास लोकसभा, विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय गावकर्यानी घेतला आहे. तसेच हे आंदोलन यापेक्षाही तीव्र करण्याचं गावकऱ्यांनी ठरवलं आहे.