गणपतीपुळे : महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी शासन वचनबद्ध आहे व पुढील वर्षी होणाऱ्या सरस प्रदर्शनी साठी निधी दुपटीने वाढवून देण्यात येईल अशी घोषणा म्हाडाचे अध्यक्ष तथा आमदार उदय सामंत यांनी आज गणपतीपुळे येथे केली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा स्वरुपा साळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. बामणे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नितीन माने, जि.प सदस्य बाबू महाप आदि मान्यवर लोकप्रतिनिधी तसेच जिल्हा परिषदेतील विविध विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.
गणपतीपुळे येथील बीच वर आयोजित या प्रदर्शनात 185 स्वयंसहाय्यता बचत गट सहभागी झाले आहेत. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जीवनोन्नती अभियान नाबार्ड आणि जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन करण्यात आले आहे उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा स्वरूपास साळवी या होत्या. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांचीही यावेळी विशेष उपस्थिती होती.
महिलांना अधिक सक्षम करण्यासाठी त्यांना रत्नागिरीत शाश्वत स्वरूपाचे विक्री केंद्र उपलब्ध करून देण्यास आपण प्राधान्य देऊ असे सांगून आमदार म्हणाले की या महिलांना प्रशिक्षण सातत्यपूर्ण पाठिंबा आणि अर्थसहाय्य यातून पुढे जाता येईल याचे नियोजन अधिकाऱ्यांनी करावे.
परदेश सहलीचे आयोजन देखील करता येईल ज्यातून तेथे होणाऱ्या विक्री व पॅकिंग संदर्भातील माहिती या महिलांना मिळू शकेल या दृष्टीकोनातून प्रयत्न करा असे आमदार सामंत यावेळी म्हणाले.
या प्रदर्शनीचे उद्घाटन आमदार सामंत यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले त्यानंतर राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली
यावेळी चिपळूण येथील एचडीएफसी बँकेचे व्यवस्थापक नामदेव कोल्हे यांना एक कोटी वित्तसहाय्य उपलब्ध करून दिल्याबद्दल सन्मानित करण्यात आले तसेच सातत्याने बचत गटांच्या प्रसिद्धीसाठी लोकमतचे संगमेश्वर येथील पत्रकार सचिन मोहिते यांचाही गौरव करण्यात आला यासोबतच तीन महिला बचत गटांचा सन्मान आमदार महोदयांच्या हस्ते याप्रसंगी करण्यात आला.
नाताळच्या सुट्टीत आणि पर्यटन हंगामात या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे त्यामुळे मागील वर्षी 35 लाखांचा व्यवसाय प्रदर्शनीत झाला त्याहीपेक्षा अधिक व्यवसाय यावर्षी अपेक्षित आहे असे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे नितीन माने यांनी प्रास्ताविकात सांगितले.
श्री गमरे यांनी या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.