रत्नागिरी, प्रतिनिधी : रत्नागिरी शहराजवळील काळबादेवी येथील एका मच्छिमाराला आतापर्यंतची सर्वात मोठा सुमारे दीडशे किलोचा वाघळी मासा सापडला. विक्रीसाठी नेणाऱ्या छोट्या टेम्पोचा पूर्ण हौद त्या माशाने व्यापला होता. कोरोनामुळे दर मात्र कमी मिळाला. मात्र ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाघळी समजली जात आहे.
तौक्ते चक्रीवादळ सरून गेलं आणि मासळी समुद्रातून गायब झाली. छोटे मच्छिमार किनाऱ्यापासून काही अंतरावर मिळेल ते मासे पदरात पडून घरी परत येत आहेत. काळबादेवी येथील मच्छिमार संदेश मयेकर मिऱ्यापासून काही अंतरावर तांडेल निकेत मयेकर यांच्यासह ही नौका मासेमारी करत होती. फारसा मासा मिळत नव्हता. ते माघारी फिरले. परत येताना जाळ टाकलं आणि अचानक जाळ्यात मासे लागल्याचं त्यांना जाणवलं. जाळ्याला जड लागल्यामुळे कुतूहल वाढलं. जाळ पाण्या बाहेर ओढण्यास सुरुवात केली आणि नौकेतील मच्छिमाराच्या चेहरा फुलून गेला. मासळी ची कमतरता असताना वाघळी माश्याचा मटकाच लागला होता. भराभर मासा पाण्याबाहेर काढला आणि ते किनाऱ्यावर धावले. एवढा मोठा मासा विक्रीला न्यायचा म्हणजे गाडीशिवाय पर्याय नव्हता. छोटा टेम्पो मागवला. आकाराने मोठी असलेली वाघळी त्या गाडीच्या हौदात टाकली. पूर्ण जागा त्या एका माशाने भरून गेली होती.
मिऱ्या येथील काही लोकांनी तो मासा विकत घेतला. सुमारे 150 किलोचा हा मासा 6 फूट बाय 7 फुटाचा असावा. सध्या कोरोनामुळे दर कमी असल्यामुळे त्याला थोडी कमी किंमत मिळाल्याची चर्चा होती. मात्र एवढा मोठा मासा प्रथमच रत्नागिरीच्या किनारी सापडल्याचे मच्छिमारांनी सांगितले. या माशाला बाजारात किलोला 170 रुपये दर मिळतो. या माशाला चांगली मागणी आहे.
दरम्यान, आठवड्यापूर्वी तौक्ते चक्री वादळामुळे समुद्र खवळला होता. त्यामुळे हा मासा किनाऱ्यावर आला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान एवढा मोठा वागळी मासा प्रथमच मिळाला आहे. सकाळपासून मासेमारी करत होतो. दुपारी माघारी येताना जाळीत मासा सापडला. कोरोनामुळं माशाला दर मात्र कमी मिळाल्याचं तांडेल निकेत शिवलकर यांनी सांगितलं.