रत्नागिरी (आरकेजी): मुंबई – गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या नावाखाली शासन जनतेची चेष्टा करीत आहे. यात प्रकल्पग्रस्त भरडले जात असून शासनाने प्रकल्पबाधितांचे प्रश्न मार्गी लावल्याशिवाय चौपदरीकरणाचे काम होऊ देणार नाही, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते शौकतभाई मुकादम यांनी दिला आहे. लांजा येथे मुंबई-गोवा महामार्ग प्रकल्पग्रस्तांच्या बैठीकेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
मुंबई-गोवा महामार्गासाठी शासन जमिन खरेदी करीत आहे. मात्र यामध्ये या चौपदरीकरणाच्या कामात प्रत्यक्षात प्रकल्पग्रस्त भरडले जात आहेत. रेडी रेकनरचे दर चुकीच्या पद्धतीने लावण्यात आलेले आहेत. या विषयासंदर्भात संबंधित विभागातील प्रांताधिका-यांनी साधी बैठकही बोलावलेली नाही. यामुळे छोटी दुकाने, गाळेधारक, खोकेधारक, भाजीविक्रेते यांच्या जागेचा प्रश्न निर्माण होणार आहे. शासनाने त्यांना पर्यायी व्यवस्था करुन द्यावी. लांजा शहरातील नागरीकांच्या मागणीनुसार त्यांना चार पट मोबदला मिळाला पाहिजे. त्यांना प्रकल्पग्रस्त म्हणून दाखला मिळाला पाहिजे. या प्रमुख मागण्या सोडविल्या गेल्या नाहीत तर महामार्गाचे चौपदरीकरण होऊ देणार नाही असा ईशारा मुकादम यांनी केला आहे. यावेळी महंमद रखांगी, प्रसन्न शेट्ये, भाऊ वंजारे, जयवंत शेट्ये, परवेज घारे, विजय खवळे आदिंसह लांजातील शेकडो प्रकल्पग्रस्त या बैठकीत उपस्थित होते.