रत्नागिरी, (आरकेजी): रत्नागिरी जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून शहरांमधील बाजारपेठांमध्ये पुराचे पाणी घुसले आहे.
मंगळवारी साय़ंकाळनंतर कोसळण्यास सुरवात झालेल्या पावसामुळे खेड शहरात जगबुडी नदीचे पाणी घुसलं होते. खेड शहरातील मच्छिमार्केट, निवासा चौक, गांधी चौकापर्य़त जगबुडी नदीचे पाणी आले होते. जगबुडी आणि नारिंगी नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहू लागल्या आहेत. या दोन नद्यांना पुर आला होता. त्यामुळे खेड नगरपरिषदेने नागरिकांसाठी भोंगा वाजवून नागरिकांना सतर्कतेच्या सुचना दिल्या आहेत. नारींगी नदीचे पाणी दापोली खेड रस्त्य़ावर आलं आहे, त्यामुळे वाहतुक धिम्या गतीने सुरु आहे. खे़ड बहिरवली रस्त्यावर पाणी आल आहे. पावसाचा जोर अद्याप कायम आहे. तर दुसरीकड़े चिपळूणमध्येही वाशिष्ठी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.
संगमेश्वर तालुक्यात सुद्धा पावसानं हाहाकार माजवलाय. संगमेश्वर शहरातल्या आठवडा बाजारात पुराचं पाणी घुसलं आहे.शास्त्री नदिला पुर आल्यानं संगमेश्वर.बाजारपेठेला धोका निर्माण झालाय. तलाठी कार्यालयाने व्यापाऱ्यांना स्थलांतराच्या नोटीसा बजावल्यात. सोनवी नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. पाणी आणखी वाढल्यास संगमेश्वरला पुराचा धोका आणखी वाढणार आहे.