रत्नागिरी ( विशेष प्रतिनिधी) : रत्नागिरी पंचायत समितीच्या आजच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी गदारोळ घातला. सभापतींच्या आदेशाचा अपमान केल्याच्या निषेधार्थ आज सदस्यांनी सभात्याग करत बाहेरचा मार्ग धरल्याने बुधवारी सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली.
रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे गावात झालेल्या अनधिकृत बांधकाम आदी तकारींच्या कारणातून तेथील ग्रामसेवकाला पंचायत समितीच्या सभेत हजर होण्याचे फर्मान सभापती मेघना पाष्टे यांनी काढले होते. मात्र आदेश देऊनही हजर न राहिलेल्या ग्रामसेवकाला पाठीशी घालणाऱ्या गटविकास अधिकाऱ्यांविरोधात सदस्य आक्रमक झाले होते. सर्वसाधारण सभेत कोतवडे ग्रामपंचायतीच्या कारभारावरून उपस्थित सदस्यांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना खडसावून जाब विचारला. त्यावेळी सदस्य गजानन पाटील, उत्तम सावंत, दत्तात्रय मयेकर, अभय खेडेकर आदी सदस्यांनी प्रशासनाची कोंडी केली. कोतवडे ग्रा.पं.हद्दीत वारे-ढोकमळे समुद्र किनारी झालेल्या सुरूवनातील झाडे तोडीचे प्रकरण सदस्य गजानन पाटील यांनी यावेळी उपस्थित केले. सुरूबनातील फयान वादळातील पडलेल्या जुनाट झाडांचा लिलाव झालेला होता. मात्र वनविभागाने चुकीचे मुल्यांकन केले. त्यामुळेच कवडीमोल किंमतीने येथील ५५१ लिलाव झालेल्या झाडांपैकी १५६ जिवंत झाडांवर कुऱ्हाड फिरवण्यात आली असल्याचे सदस्य गजानन पाटील यांनी सांगितले. येथील वृक्षतोड सरसकट करण्यात आलेली असल्याचे गटविकास अधिकारी विवेक जमदाडे यांनी सभेसमोर स्पष्ट केले आहे. या पकरणात मोठा भ्रष्टाचार झालेला असून त्याची चौकशी करण्याची मागणी सदस्य गजानन मयेकर यांनी सभेसमोर केली. त्याबाबत वनमंत्र्यांकडे तकार करणार आहे. या पकाराबाबत तात्काळ चौकशी करण्यात यावी असे सभापती मेघना पाष्टे व उपसभापती सुनील नावले यांनी प्रशासनाला सूचना केल्या. कोतवडे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाच्या कारभारावरून या सभेत चांगलाच गदारोळ माजला. एकीकडे आचारसंहिता काळात विकासकामांवर बंधने असताना या ग्रा.पं.हद्दीत रस्त्यांची कामे मार्गी लागली असल्याचे गजानन पाटील यांनी तक्रार केली. त्यावर चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही गटविकास अधिकारी जमदाडे यांनी दिली. ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरात झालेल्या इमारतीच्या अनधिकृत बांधकामाबाबत ग्रामसेवक देवीदास इंगळे यांच्या कारभाराचा पाढा सदस्यांनी वाचला. त्याबाबत झालेल्या तक्रारीवरून सभापती मेघना पाष्टे यांनी या सभेत ग्रामसेवक इंगळे यांनी हजर राहून स्पष्टीकरण देण्याचे फर्मान काढलेले होते. पण ग्रामसेवक इंगळे यांनी हजर न राहण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांनीच आदेश दिल्याचे सदस्यांनी सांगितले. गटविकास अधिकारी विवेक जमदाडे हे त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप सदस्य गजानन पाटील, उत्तम सावंत, दत्तात्रय मयेकर, अभय खेडेकर आदींनी केला. सभापतींनी दिलेला आदेश न पाळण्यावरून गटविकास अधिकाऱ्यांना या सभेत आकमक सदस्यांनी चांगलेच फैलावर घेतले. सभापतींचे ऐकले जात नसेल तर सभेचे कामकाज चालवायचे नाही. गटविकास अधिकाऱयांनी यापुढे ग्रामसेवकांना घेऊनच कामकाज चालवा असे सांगत यावेळी सभात्याग करून सभागृहाबाहेरचा मार्ग धरला. त्यामुळे पंचायत समितीची ही सभाही तहकूब करण्यात आली.