रत्नागिरी (आरकेजी): गेल्या वर्षभरामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात एकूण १९३४ गुन्हे दाखल झाले होते, त्यापैकी १४१६ गुन्हे उघडीस आणण्यात रत्नागिरी पोलीसांना यश आले आहे. पोलीस अधिक्षक प्रणय अशोक यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. खून, खूनाचा प्रयत्न, बलात्कार, विनयभंग या केसेसमध्ये पोलीसांनी चांगली कामगिरी बजावल्याचे त्यांनी सांगितले.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये २०१७ मध्ये दाखल व उघड गुन्ह्यांबाबतची माहिती तसेच कायदा व सुव्यवस्था आणि वर्षभरात राबविण्यात आलेल्या नवीन योजना याबाबत करण्यात आलेल्या कार्यवाहिबाबतच्या वार्षिक आढाव्याची माहिती पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली.
रत्नागिरी जिल्ह्यात २०१७ मध्ये खुनाच्या एकूण १२ केसेस दाखल झाल्या होत्या. मात्र त्यापैकी ११ केसेसचा पोलीसांनी छडा लावला आहे. तर खुनाच्या प्रयत्नामधील चारही केसेस सोडवण्यात पोलीसांना यश आले आहे. दरम्यान गेल्या दोन वर्षामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात घरफोडी, चोरीच्या गुन्ह्यात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या दोन वर्षात घरफोडी आणि चोरीचे एकूण १ हजार ६७ गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र यापैकी ३६८ गुन्हे हे उघडकीस आले आहेत. २०१७ मध्ये घरफोडीचे एकूण १४७ गुन्हे दाखल झाले होते. मात्र त्यापैकी फक्त ४९ केसेसचा छडा पोलीसांनी लावला आहे. तसेच चोरीच्या जिल्ह्यात एकूण ४०२ केसेस झाल्या असून त्यापैकी १३४ चोरींच्या घटना पोलीसांनी उघडीस आणल्या आहेत. घरफोडीच्या प्रकरणामधील एकूण १ कोटी ५५ लाख ८६ हजाराचा मुद्देमाल चोरीस गेला होता. त्यापैकी ४५ लाख ७ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यास आला आहे. तर चोरीच्या प्रकरणांमध्ये २ कोटी ५७ लाख ८८ हजाराचा मुद्देमाल चोरीस गेला होता. त्यापैकी ५७ लाख ३४ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यास पोलीसांना यश आल्याची माहिती प्रणय अशोक यांनी दिली. २०१७ मध्ये जबरी चोरीच्या एकूण २५ केसेस दाखल झाल्या होत्या. त्यापैकी २२ प्रकरणांच्या मुळांपर्यंत पोहचण्यास पोलीसांना यश आले आहे.
बलात्कार, विनयभंग या प्रकरणांमध्ये वाढ होत असून बलात्काराचे यावर्षी जिल्ह्यात ४७ गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी ४६ गुन्हे पोलीसांनी उघडकीस आणले आहेत. तर विनयभंगच्या प्रकरणामध्ये १०५ गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी ९५ गुन्हे उघडकीस आणले आहेत. सोशल मिडियाच्या वाढत्या प्रभावामुळे हे गुन्हे वाढत असल्याचे यावेळी प्रणय अशोक यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनीही सोशल मिडियाचा वापर करताना विशेष काळजी घेतली पाहिजे. विशेषत: तरुण पिढीने याकडे गांभिर्याने बघितले पाहिजे, असे आवाहनही प्रणय अशोक यांनी केले आहे.
दरम्यान २०१७ मध्ये सदोष मनुष्यवधाचे एकूण ४ गुन्हे, गर्दी-मारामारीचे ९३ गुन्हे, दुखापतीचे २१३ गुन्हे दाखल झाले होते. हे सर्व गुन्हे पोलीसांनी उघडकीस आणले आहे.
अवैध धंद्याविरोधात २०१७ मध्ये पोलीसांनी केलेल्या धडक कारवाईमुळे २०१६ वर्षापेक्षा यावर्षी या प्रकणात यावर्षी सर्वाधिक आरोपी पकडण्यास पोलीसांनी महत्वाची कामगिरी बजावली आहे. २०१६ मध्ये दारुबंदी प्रकरणात २४६ केसेस दाखल झाल्या होत्या. मात्र २०१७ मध्ये तब्बल ६२८ केसेस दाखल झाल्या.त्यामध्ये ५९९ आरोपींवर कारवाई केली. जुगार प्रकरणात २०१७ मध्ये ७४ केसेस दाखल झाल्या होत्या. त्यामध्ये १३४ आरोपींवर कारवाई करण्यात आल्याची माहिती यावेळी प्रणय अशोक यांनी दिली. या पत्रकार परिषदेत अप्पर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिरीष सासणे, वाहतूक पोलीस निरीक्षक अयुब खान उपस्थित होेते.