
नाणार रिफायनरीच्या विरोधात राणेंची ८ फेब्रुवारीला सभेबाबत माहिती देताना निलेश राणे
रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील नाणारमधील प्रस्तावित ऑईल रिफायनरी प्रकल्पाविरोधात नारायण राणे यांनी दंड थोपटले आहेत. येत्या ८ फेब्रुवारीला राणे जाहीर सभा घेणार अाहेत, अशी माहिती माजी खासदार आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी शिवसेनेवर प्रहार करत जमिनी खरेदीत शिवसेनेच्या दलालांचा भरणा असल्याचा आरोप केला. तसेच कोणत्याही परिस्थितीत रिफायनरी होवू देणार नाही, असा पवित्रा राणेंनी घेतला आहे.
राजापूर तालुक्यातील प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबतचा शिवसेनेचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे. येथील प्रकल्पग्रस्त अंगावर येऊ लागल्यावरच सेनेने प्रकल्पाला विरोध सुरू केला. प्रकल्पाबाबत अधिसूचना काढूनसुध्दा शिवसेना निर्लज्जपणे प्रकल्प रद्द करायला निघाली आहे. रिफायनरीबाबत सेनेची भुमिका दुटप्पीपणाची आहे. खा. राऊत यांनी वारंवार नारायण राणेंचे नाव घेणे म्हणजे त्यांना प्रकल्प सोडून राणेंमध्येच अधिक रस असल्याचे दिसून येत आहे. नारायण राणेंचे नाव घेऊन, प्रकल्प रद्द होणार असेल, तर खा. राऊत यांनी दिवस-रात्र राणेंचा जप करावा, अशी खरमरीत टिका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस, माजी खासदार निलेश राणे यांनी केली. येत्या ८ फेब्रुवारीला नाणार येथे रिफायनरी प्रकल्पग्रस्तांचा जाहीर मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याला नारायण राणे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. याबाबत माहिती देण्यासाठी येथील ‘रायगड’ निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत निलेश राणे बोलत होते. रिफायनरी प्रकल्पाला येथील १४ गावांतील प्रकल्पग्रस्तांचा विरोध आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षदेखील प्रकल्पग्रस्तांच्या पाठिशी असल्याचे सांगितले.
रिफायनरीबाबत सेनेची २०१६ पासून भुमिका बदलत आहे. त्यांच्याच मंत्र्यांने अधिसूनचा काढून सुध्दा निर्लज्जपणे प्रकल्प रद्द करायला निघाले आहेत. सेनेच्या बदलत्या भुमिकेमुळेच त्यांचा दुटप्पीपणा जनतेसमोर उघडा पडला आहे. खरेतर त्यांना रिफायनरीवरून जनतेचे लक्ष विचलित करायचे आहे. वास्तविक रिफायनरी रद्द करण्यासाठी धमक लागते, वजन लागते ते खा. राऊत यांच्यामध्ये नाही. केवळ वेगळे वळण देण्यासाठी ते राणेंचे नाव घेतले जात आहे. खोटं बोलून जास्तवेळ निवडणुका जिंकता येत नाहीत, येणारा काळ हे दाखवून देईल, असा इशारा राणे यांनी दिला. रिफायनरी प्रकल्पाबाबत ४० टक्के मोजणी पूर्ण झाल्याचा दावा शासन करत आहे. त्यातच शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे प्रकल्पस्थळी येऊन, प्रकल्पग्रस्तांची भेट घेणार आहेत. परंतु, प्रकल्प परिसरातील १४ पैकी १२ ग्रामपंचायती सेनेच्या आहेत. येथील आमदार, खासदार, मंत्री एवढेच नव्हे, तर राज्यात सत्तादेखील शिवसेनेची आहे, असे असताना शिवसेना बोट कोणाकडे दाखवते? असा सवाल राणे यांनी यावेळी उपस्थित केला.