रत्नागिरी (आरकेजी): रत्नागिरी नगरपरिषदेच्या सर्व विषय समिती सदस्य, सभापती तसेच स्थायी समिती सदस्यपदी शिवसेना नगरसेवकांच्या निवड बिनविरोध झाल्या. पाणीपुरवठा समिती सभापतिपदी राकेश ऊर्फ बाबा नागवेकर, महिला बालकल्याण सभापतिपदी श्रद्धा हळदणकर, उपसभापतिपदी फरहा पावसकर, आरोग्य समिती सभापतिपदी दिशा साळवी, बांधकाम समिती सभापतिपदी रशिदा गोदड, तर नियोजन समिती सभापतिपदी सुहेल मुकादम यांची निवड झाली. याचबरोबर मानाच्या स्थायी समिती सभापतीपदी पुन्हा प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांची निवड झाली.
रत्नागिरी नगर परिषदेमध्ये 30 पैकी 17 नगरसेवकांचे पूर्ण बहुमत असल्याने सर्व निवडी बिनविरोध झाल्या. विरोधी सदस्यांकडून कोणीही उमेदवारी अर्ज भरले नाहीत. केवळ शिवसेना उमेदवारांचे नामनिर्देशित पत्र आले. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरलेल्या सर्व सेना सदस्यांच्या निवडी बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले.