रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेच्या सभापतींची गुरूवारी बिनविरोध निवड झाली. विषय समित्यांच्या सभापतींची नावे निश्चित करताना केवळ खांदेपालट करण्यात आली आहे. शिवसेनेकडून नव्या जुन्यांचा अचुक मेळ साधण्यात आला. पाणी खाते सुहेल मुकादम यांना देण्यात आले.
रत्नागिरी नगर परिषदेवर शिवसेनेचे बहूमत आहे. ३० पैकी १७ नगरसेवक सेनेचे आहेत. गतवर्षी डिसेंबर महिन्यात झालेल्या सभापती निवडीला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर सभापती निवडीसाठी नवा वडणुक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. नगरसेवक संख्या अधिक असल्याने सेनेकडून इच्छुकांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणावर होती. यामुळे सभापती पदासाठी नावे निश्चित करताना सेनेने सावध पवित्रा घेतला. बुधवारी सायंकाळी सेनेकडून सभापती पदासाठीची नावे निश्चित करण्यात आली.
गुरूवारी सकाळी नगराध्यक्ष राहुल पंडीत यांच्या दालनात झालेल्या बैठकीत सभापतींनी आपले उमेदवारी अर्ज भरून सीईओ अरविंद माळी यांच्याकडे सादर केले. सभापतींची नावे निश्चित करताना यावेळी केवळ खांदेपालट करण्यात आली आहे.
यावेळी पाणी सभापती पदासाठी सुहेल मुकादम, स्वच्छता व आरोग्य समितीच्या सभापती पदासाठी संतोष उर्फ बंटी कीर, बांधकाम समितीसाठी वैभवी खेडेकर, नियोजन समिती सभापती पदासाठी राकेश उर्फ बाबा नागवेकर आणि महिला व बालकल्याण समिती सभापती पदासाठी मिरा पिलणकर आणि उपसभापती पदावर दया चवंडे यांची अर्ज सादर केले. दुपारी दोन वाजता उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया करण्यात आली. एका सभापती पदासाठी एकच अर्ज आल्याने सर्व सभापती पदांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. याशिवाय स्थायी समितीमध्ये विषय समितीवर राजन शेटये आणि मधुकर घोसाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.