रत्नागिरी, (विशेष प्रतिनिधी): रत्नागिरी मिऱ्या ते नागपूर या प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण वादात सापडले आहे. रत्नागिरीतील मिऱ्या ते हातखंबा पर्यंतचे रुंदीकरण वगळावे यासाठी व्यापारी तसेच ग्रामस्थ आक्रमक झाले. याच संदर्भात आज साळवी स्टाँप ते पानवळ गावापर्यतच्या ७४० व्यापाऱ्यांनी मोर्चा काढत आपली दुकाने बंद ठेवत विरोध दर्शवला.
साळवीस्टाँप, कुवारबाव, मिरजोळे, खेडळी, पानवल अशा गावातल्या व्यापाऱ्यानी आज या बंदला उस्फुर्त प्रतिसाद दिला. या महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे हजारो व्यवसायिक बाधित होणार आहेत. अनेक कुटुंब बेघर होणार आहेत. त्यामुळे कुवारबाव व्यापारी संघाने हि बंदची हाक दिली होती. या आगोदर महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या भुसंपादनाला विरोध करण्यात आला होता. आता दुसरा टप्पा म्हणून व्यापाऱ्यांनी बंदची हाक देवून महामार्गाच्या चौपदरीकरणाला विरोध दर्शवत विरोधाची धार आणखी तीव्र केली आहे. दरम्यान या महामार्गाच्या चौपदरीकरणाला विरोध करण्यासाठी व्यापाऱ्यांनी मोर्चा देखील काढला. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर व्यापाऱ्यांनी काही काळ महामार्ग रोखून धरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला होता.