रत्नागिरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेना रत्नागिरी शहर पदाधिकाऱ्यांनी महावितरण कार्यालय रत्नागिरी येथे अधिक्षक अभियंत्यांची भेट घेत संपूर्ण गणेशोत्सव काळ हा भारनियमन मुक्त करावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात त्यांनी म्हटलं आहे की, संपूर्ण कोकणासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा असणारा गणेशोत्सव सण थोड्याच दिवसांवर येऊन ठेपला आहे. या काळात सर्व कुटुंब एकत्र येतात. हजारो चाकरमानी खास सुट्टी घेऊन गावी घरी येतात, आपले मित्र व नातेवाईकांसोबत हा उत्सवकाळ उत्साहात साजरा करतात. दहा दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सार्वजनिक गणेशोत्सवात देखील मोठ्या प्रमाणात कार्यक्रम उपक्रम आयोजित करण्यात येतात. अशा मंगलप्रसंगी भारनियमन झाल्याने उत्सवाचा रसभंग होतो. हे टाळण्यासाठी संपूर्ण गणेशोत्सव काळात भारनियमन होऊ नये अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. यावेळी मनसे शहरअध्यक्ष अद्वैत कुलकर्णी, शहर सचिव अजिंक्य केसरकर, उपशहरअध्यक्ष गौरव चव्हाण,महिला उपशहरअध्यक्ष शिल्पाताई कुंभार,शाखाध्यक्ष साहिल वीर, मनसे रस्ते आस्थापना शहर संघटक सुशांत घडशी,अनंत शिंदे आदी महाराष्ट्रसैनिक, पदाधिकारी उपस्थित होते.