रत्नागिरी (आरकेजी): रत्नागिरी जिल्ह्यात म्हाडाचे अनेक प्रकल्प रखडले आहेत. ते मार्गी लावण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. तसेच जिल्ह्यात सुमारे अडीच हजार नवीन घरे बांधण्यात येणार असल्याची महाराष्ट्र म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना ना. सामंत म्हणाले, जिल्ह्यातील रखडलेल्या म्हाडाच्या प्रकल्पांबाबत संबंधीत अधिकाऱ्यांची बैठक घेवून महत्वाचे निर्णय घेण्यात आले. चिपळूण तालुक्यातील ११ एकर जागा १९८८ पासून म्हाडाच्या ताब्यात आहे. संघर्ष समितीने याला विरोध केला होता. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी यापैकी ४० टक्के जागा भाडेतत्वावर शेतकऱ्यांकडून ताब्यात घ्यायची आणि ६० टक्के जागा विकासकाला द्यायची असा निर्णय घेतला होता. यापैकी महामार्गासाठी गेलेल्या जमिनीचा मोबदलाही शेतकऱ्यांना द्यायचा निर्णय झाला आहे. उर्वरीत ६० टक्के जागेत ३ फेजमध्ये घरे बांधण्यात येणार आहेत. एकूण १ हजार ५०० घरांपैकी ५०० घरांची प्रक्रिया तात्काळ सुरु करण्यात येणार आहे. यामध्ये म्हाडाच्या योजनेंतर्गत २५० तर पंतप्रधान आवास अंतर्गत २५० घरे बांधण्यात येणार आहेत.
रत्नागिरी शहरानजीक नाचणे येथे ५ एकर जागा म्हाडाच्या मालकीची आहे. त्यावरही शासकीय कर्मचाऱ्यांसाठी वसाहत उभारण्यात येणार आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांसाठी ३०० तर नागरिकांसाठी ३०० घरे उपलब्ध करून देणार असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले. दापोलीतही ३०० घरे बांधण्यात येणार असून ज्या ज्या ठिकाणी झोपडपट्टींचे पूनर्वसन करावयाचे आहे. त्या ठिकाणी ते विकासकाला बरोबर घेवूनच करणार असल्याचे ना. सामंत यांनी स्पष्ट केले. ज्या नगर पालिकेच्या हद्दीत म्हाडेच प्रकल्प उभे राहणार आहेत. तेथून नगरपालिकेकडून म्हाडाकडे प्रस्ताव आल्यावर तात्काळ कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सद्यस्थितीत एकूण २ हजार ६०० पैकी १ हजार ९०० घरे बांधण्याचा निर्णय झाला असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले. म्हाडाची सर्व घरे लॉटरी पद्धतीने उपलब्ध होणार असल्याचेही ना. सामंत यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पंतप्रधान आवास योनजेंतर्गत १ हजार ९०० घरे उपलब्ध होत असतानाही आजपर्यंत या योजनेची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे पंतप्रधान आवास योजनेतून एकालाही घर दिले नसल्याची खंत ना. सामंत यांनी यावेळी स्पष्ट केली.