रत्नागिरी, प्रतिनिधी : रत्नागिरी शहरातील मेस्त्री हायस्कूल येथील लसीकरण केंद्रावर आज लोकांनी तोबा गर्दी केल्याने मोठा गोंधळ उडाला. त्यामुळे पोलिसांना यामध्ये हस्तक्षेप करावा लागला.
सध्या ऑनलाईन व अन्य मार्गाने लसी मिळत नसल्याने लसीकरण केंद्रांवर नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करीत आहेत. दरम्यान आज मिस्त्री हायस्कूल येथील केंद्रावर सकाळी १८ते ४४ वर्षांकरिता ऑनलाईन पध्दतीने बुकिंग झालेल्याना लस देण्याचा कार्यक्रम सुरू होता. त्यामुळे ते नागरिक त्याठिकाणी उपस्थित होते. याच केंद्रावर दुपारनंतर ४५ वर्षांवरील लोकांसाठी दुसर्या लसीचा कार्यक्रम होता. परंतु अनेक केंद्रावर लसींचा साठा अपुरा येत असल्यामुळे, त्यातच ४५ वरील अनेकांच्या दुसर्या लसीची मुदत संपत आल्याने लस मिळण्यासाठी नागरिकांनी सकाळी पाच वाजल्यापासून रांग लावली होती. त्यामुळे याठिकाणी गर्दी होऊन गोंधळ उडाला व याठिकाणी वादावादीचे प्रसंग सुरू झाले दरम्यान यावेळी पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी हस्तक्षेप करून दुपारनंतर असणार्या लसीकरणासाठी आलेल्या लोकांना तेथून बाजूला केलं. व दुपारनंतर येण्यास सांगितले. त्यामुळे लोकांच्यात आणखी संतापाचे वातावरण निर्माण झाले. सकाळपासून लाईन लावूनही लस मिळणार नसेल तर काय करायचे असा सवाल विचारला जात होता, तर लसीकरणासाठी थेट आलेल्या लोकांनी गर्दी पाहून काहीनी तेथूनच माघारी परतण्याचा निर्णय घेतला. एकूणच वेगवेगळ्या लसीकरण केंद्रावर गर्दी व गोंधळाचे प्रकार वारंवार घडत आहेत.