रत्नागिरी दि. 08 : क्रीडा व खेळाचा विकास, पारंपारीक खेळ व क्रीडा विषयक बाबींचे जतन, व्यायामशाळा व तालीम यांच्या माध्यमाद्वारे होत असून, युवांची शारीरिक सुदृढता वाढविणे हे व्यायामशाळा विकास योजना आणि उद्योन्मुख खेळाडूंना क्रीडा कौशल्य व क्रीडा गुण विकसीत करण्याची संधी उपलब्ध होण्यासाठी सुयोग्य क्रीडांगणाच्या मुलभूत सुविधा तयार होणे आवश्यक असल्यामुळे क्रीडांगण विकास अनुदान योजना कार्यान्वित आहे.या योजनेंचा लाभ घेण्यासाठी सन 2021-22 साठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. तरी विहीत नमुन्यातील अर्ज व अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी, जिल्हा क्रीडा संकुल,बाफना मोटर्सजवळ,एम.आय.डी.सी.मिरजोळे,ता.जि.रत्नागिरी येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.
अनुदानासाठी पात्र संस्था पुढीलप्रमाणे आहेत. शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था(ग्रामपंचायत,नगरपरिषद,नगरपंचायत,महानगरपालिका,जिल्हा परिषद, कँटोनमेंट बोर्ड)शासकीय रूग्णालय,शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग व उच्च शिक्षण विभाग यांनी मान्यता दिलेल्या शाळा व महाविद्यालये तसेच जिल्हा परिषद, आदिवासी विकास व सामाजिक न्याय विभाग, अल्पसंख्यांक विभाग मार्फत चालविण्यात येणा-या सर्व शासकीय प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा,आश्रमशाळा व वसतिगृह, शासकीय उप जिल्हा रूग्णालय, शासकीय जिल्हा रूग्णालय, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच शासनाद्वारे मान्यता दिलेल्या शैक्षणिक शाळा व महाविद्यालयांना शासनामार्फत अनुदान मिळण्यास प्रारंभ होवून ५ वर्षे पुर्ण झालेले आहेत असे शाळा व महाविद्यालये अनुदानासाठी पात्र असतील. क्रीडा विभागाच्या विविध समित्या तसेच पोलीस कल्याण निधी/पोलीस विभाग, शासकीय कार्यालये/जिमखाना हे अनुदानासाठी पात्र असतील. व्यायामशाळा विकास अनुदान योजना या योजनेंतर्गत जास्तीत जास्त रू.७.०० लक्ष निधी मंजूर केला जातो. तर क्रीडांगण विकास अनुदान योजना या योजनेंतर्गत रू. ७.०० लक्ष व फक्त क्रीडा साहित्य खरेदी करीता जास्तीत जास्त रू. ३.०० लक्ष निधी मंजूर केला जातो.