रत्नागिरी. 26 may : रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. संगमेश्वर तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णाचा जिल्हा रुग्णालयात आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ते 61 वर्षांचे होते. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता 5 वर पोहचली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. यापूर्वी जिल्ह्यात कोरोनामुळे 4 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
मुंबईतून संगमेश्वर येथे दाखल झालेल्या या रुग्णाचा मंगळवारी उपचारा दरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. संगमेश्वर तालुक्यातील माळवाशी गावचे ते रहिवासी आहेत. मुंबईतून ते गावी आले होते. 19 मे रोजी त्यांना उपचारासाठी रत्नागिरीत नेण्यात आले होते. मागील 8 दिवस ते कोरोनाशी झुंज देत होते. मंगळवारी सकाळी 10 वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे संगमेश्वर तालुक्यात कोरोनामुळे पहिल्या बळीची नोंद झाली आहे. दरम्यान आता एकूण 93 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.