रत्नागिरी, प्रतिनिधी : जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. चिपळूण, खेड तसेच रत्नागिरीतीलही काही भाग जलमय झाला आहे.
चिपळूण पुराच्या पाण्यात
मुसळधार पाऊस त्यात वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहर जलमय झालं आहे. चिपळूणमध्ये 2005 पेक्षा देखील भयानक परिस्थिती चिपळूणमध्ये आहे. अनेक ठिकाणी लोकं अडकून पडली आहेत. शहरातील जुना बाजार पूल, बाजारपेठ, जुने बस स्टॅन्ड, चिंचनाका मार्कंडी, बेंदर्कर आळी, मुरादपूर रोड, एसटी स्टँड ,भोगाळे ,परशूराम नगर परिसरात पाणी वाढत आहे. काही ठिकाणी पाच फुटांपेक्षा जास्त पाणी आहे.. तर खेर्डीमध्ये पाच फुटांपेक्षा जास्त पाणी शिरले असून अख्खी बाजारपेठ पाण्याखाली आहे. मुंबई- गोवा महामार्ग, कराड रोड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तर शहरातील ब्रिटिशकालीन बहादूर शेख पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अनेक घरांमध्ये छपरापर्यंत पाणी आल्याने शेकडो लोक पाण्यात अडकले आहेत. अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर अनेक जण घरात अडकले आहेत. पहाटे चार वाजल्यापासून शहरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरू लागले. शहरालगतच्या खेर्डीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी शिरले असून अनेक घरे पाण्याखाली आहेत.
खेडमध्ये पुराचं पाणी
खेड शहरात जगबुडी नदीच्या पुराचं पाणी शिरलं आहे. रात्रीपासून पाणी बाजारपेठेत घुसलं. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.
रत्नागिरीतल्या चांदेराई बाजारपेठेत पाणी
काजळी नदीला पूर आल्याने चांदेराई बाजारपेठेत चार फुटांचे पाणी आहे. चांदेराई लांजा आणि चांदेराई रत्नागिरी मार्गावरती पाणी आल्याने दोन्हीकडची वाहतूक ठप्प आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प
मुसळधार पाऊस, नद्यांना आलेला पूर त्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला आहे. महामार्गावरील बावनदी पूल बंद करण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या जवळपास 4 ते 5 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. पुढील आदेश येईपर्यंत वाहतुक थांबवण्यात येणार आहे. तसेच अतिवृष्टीमुळे मुंबई गोवा महामार्गावरील अंजणारी पुलावरील वाहतूक बंद आहे. महामार्गावरील वशिष्ठी पूलही ठप्प झाला आहे.
कोकण रेल्वेवर परिणाम
मुसळधार पावसाचा परिणाम कोकण रेल्वे मार्गावर झाला आहे. कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. ठिकठिकाणी गाड्या थांबवून ठेवण्यात आल्या आहेत.














