रत्नागिरी, 28 may : कोकण रेल्वेच्या माध्यमातून रत्नगिरी जिल्ह्यात अडकलेल्या श्रमिकांना त्यांच्या राज्यात पाठवले जात आहे. बुधवारी संध्याकाळी आणखी काही कामगार रत्नागिरी आणि चिपळूण स्टेशनवरून खास ट्रेनने आपल्या राज्यात रवाना झाले. यासाठी रत्नागिरी आणि चिपळूण वरून वेगवेगळ्या ट्रेन सोडण्यात आल्या.
सध्या राज्यातील हजारो कामगार श्रमिक ट्रेनच्या माध्यमातून आपल्या राज्यात परतत आहेत. कोकणातूनही यापूर्वी काही विशेष ट्रेन कोकण रेल्वेच्या माध्यमातून सोडण्यात आल्या होत्या. सिंधुदुर्गतून तसेच रत्नागिरीतून या ट्रेन सोडण्यात आल्या होत्या. त्यानंतर पुन्हा एकदा बुधवारी संध्याकाळी दोन ट्रेन श्रमिकांसाठी सोडण्यात आल्या. रत्नागिरीतून सोडण्यात आलेली ट्रेन बस्ती-उत्तरप्रदेश येथे रवाना झाली. या ट्रेन मधून 1208 श्रमिक रवाना झाले. तर चिपळूणमधून गोरखपूर-उत्तरप्रदेश येथे ट्रेन रवाना झाली. चिपळूण रेल्वे स्थानकातून सुटलेल्या या श्रमिक ट्रेनमधून जवळपास 1400 कामगार उत्तरप्रदेशला रवाना झाले.