कोरोनाला प्रतिबंध करत असताना व्यापाऱ्यांनाही जगवणे हे आपले कर्तव्य, याची जाणीव प्रशासनाला करून दिलेली आहे – खा. विनायक राऊत
रत्नागिरी, प्रतिनिधी : जिल्ह्यातील व्यापाऱ्यांसाठी उद्यापासून काही निर्बंध शिथिल करण्याची मागणी, आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असून, त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार होईल अशी खात्री असल्याची प्रतिक्रिया खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे. आज जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यातील सर्व दुकाने बंद आहेत. यामुळे व्यापारीवर्ग मेटाकुटीला आला होता. दुकाने उघडण्यास परवानगी मिळावी अशी मागणी सुद्धा व्यापाऱ्यांनी प्रशासनाकडे केली होती. 10 जून पासून आम्ही दुकाने उघडणार या मागणीवर जिल्ह्यातील व्यापारी ठाम होते. दरम्यान व्यापाऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात खासदार विनायक राऊत यांनी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची भेट घेतली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीला आमदार राजन साळवी, उद्योजक किरणशेठ सामंत, नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी, शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके व जिल्ह्यातील व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
याबाबत बोलताना खासदार विनायक राऊत म्हणाले की,
गेल्या 63 दिवसांपासून जिल्ह्यातील दुकानं बंद आहेत. हा व्यापारी वर्ग हजारोंच्या संख्येने आहे, तो आणि त्यांच्यावर अवलंबून असणारे इतर हजारो कर्मचारी वर्ग यांची उपासमार होतेय, त्यांना खूप मोठा त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे त्यांचे व्यवसाय कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळून कसे सुरू करता येतील यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा केली. कोरोनाला प्रतिबंध करत असताना व्यापाऱ्यांनाही जगवणे हे आपलं कर्तव्य आहे. याची जाणीव प्रशासनाला करून दिलेली आहे. उद्यापासून काही निर्बंध शिथिल करावेत अशी मागणी आम्ही केलेली आहे, त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार होईल अशी आम्हाला खात्री असल्याचं खासदार विनायक राऊत यावेळी म्हणाले.