
रत्नागिरी, 10 जून : निसर्ग चक्रीवादळामध्ये कोकणचं मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार कोकण दौऱ्यावर आहेत. रायगडनंतर पवार आज रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते, सकाळी मंडणगडमध्ये आगमन झाल्यानंतर उद्ध्वस्त वेळासची त्यांनी पााहणी केली. यावेळी येथील ग्रामस्थांनी आपल्या व्यथा पवार यांच्याजवळ मांडल्या. यावेळी पवार यांच्यासोबत खा. सुनील तटकरे, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, जि. प. अध्यक्ष रोहन बने, आमदार योगेश कदम, आमदार शेखर निकम, माजी आमदार संजय कदम यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच अधिकारी उपस्थित होते.
निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड आणि दापोली तालुक्याला बसला. हजारो घरं या वादळात उध्वस्त झाली आहेत. नारळी, पोफळी, आंब्याच्या बागा या वादळात जमिनदोस्त झाल्या आहेत. विजेचे पोल ठिकठिकाणी पडले आहेत. शेकडो कोटींचं नुकसान या वादळात झालं आहे. रत्नागिरी जिल्ह्यसाठी शासनाने तातडीची 75 कोटींची मदत जाहीर केली आहे. मात्र नुकसानीचा आकडा मोठा आहे. दरम्यान नुकसान ग्रस्त कोकणची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार मंगळवारपासून कोकण दौऱ्यावर आले आहेत. मंगळवारी रायगड जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी केल्यानंतर पवार आज (बुधवार) रत्नागिरी जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले. सकाळी मंडणगडमध्ये दाखल झाल्यानंतर सुरुवातीला कासवांचं गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या वेळास गावातील नुकसानीची पाहणी केली. वेळासमधील जवळपास प्रत्येक घराला या वादळाचा फटका बसला आहे. कुणाच्या घरावर झाड पडलं आहे, तर कुणाच्या घराचं छप्पर उडालं. तर कुणाचं अक्ख घर वादळात पडलं आहे. त्यामुळे धान्य, कपडे, घरातील इतर सामान यांचं मोठं नुकसान झालं आहे. विजेचे पोळ पडल्याने लाईट नाहीय, या सर्व व्यस्था ग्रामस्थांनी शरद पवार यांच्याजवळ मांडल्या. सरकारने आम्हाला उभं करण्यासाठी जास्तीत जास्त मदत द्यावी अशा भावना ग्रामस्थांनी यावेळी पवार यांच्याकडे मांडल्या. यावेळी पवार यांनी ग्रामस्थांना आश्वस्त करताना नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत कशी मिळेल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मदतीचे निकष बदलण्यासाठी राज्य सरकारला आग्रह करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
मच्छिमारांसाठी वेगळा विचार करायला सांगणार – पवार
यावेळी मच्छिमारांनी आपल्या व्यथा शरद पवार यांच्यासमोर मांडल्या. यावेळी त्यांना आश्वसित करताना पवार म्हणाले की, ‘आधीच कोरोनामुळे मच्छिमारांचं नुकसान झालं आहे. त्यात आता वादळामुळे मच्छिमारांचं नुकसान झालं आहे. बोटींचं नुकसान झालं आहे, जाळी फाटली नुकसान, असं मोठं नुकसान मच्छिमारांचं झालं आहे. त्यामुळे मच्छिमारांसाठी राज्य सरकारला वेगळा विचार करायला सांगणार असल्याचं पवार यांनी यावेळी सांगितले.
नुकसानग्रस्त केळशीचीही पाहणी
आपण उभं रहायचं आणि आपण उभं करणार – पवार
निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका दापोली तालुक्यालाही बसला आहे. दरम्यान शरद पवार यांनी आपल्या दौऱ्यात नुकसान ग्रस्त केळशी गावाची पाहणी करत इथल्या ग्रामस्थांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना पवार म्हणाले की, हे नुकसान खूप मोठं आहे.यातून आपण उभं रहायचं आहे, आणि आपण उभं करणार असा शब्द दिला.