दुपारनंतर पावसाचा जोर पुन्हा वाढलारत्नागिरी, प्रतिनिधी : रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. गेले दोन दिवस पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. दरम्यान रात्री पडलेल्या पावसामुळे काही ठिकाणी नद्यांच्या पुराचं पाणी शिरलं. माखजन बाजारपेठेतही पुन्हा एकदा पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती.
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची मुसळधार बॅटींग सध्या सुरु आहे. रात्रीपासूनच पावसाच्या कोसळधारा पाहायला मिळताहेत, त्यामुळे सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. दरम्यान जिल्ह्यातील काही ठिकाणी पूर ओसरला असला, तरी पूरसदृश्य परिस्थिती कायम आहे. जिल्ह्यातील कोदवली, वाशिष्ठी, जगबुडी, काजळी या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. दरम्यान दुपारनंतर पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला होता.
जिल्ह्यात सरासरी 130.26 मिमी पावसाची नोंद
दरम्यान जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 130.26 मिमी तर एकूण 1172.30 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मंडणगडमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. मंडणगडमध्ये तब्बल 215.10 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर दापोली 94.30 मिमी, खेड 46.50, गुहागर 135.60 मिमी, चिपळूण 102.50 मिमी, संगमेश्वर 145.00 मिमी, , रत्नागिरी 162.90 मिमी, राजापूर 128.70 मिमी,लांजा 141.70 मिमी पावसाची नोंद झाली आहे.















