
रत्नागिरी, 31 may : रत्नागिरी जिल्ह्यात आज पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी मुसळधार, तर काही काही ठिकाणी विजांच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस बरसला. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला.
जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण होतं. त्यात उष्णतेमुळे वाढलेल्या उकाड्याने नागरीकही हैराण झाले होते. अखेर दुपारनंतर पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. चिपळूण, संगमेश्वर, देवरुख, रत्नागिरीमध्ये जोरदार पाऊस बरसला. काही ठिकाणी बच्चेकंपनीने या पावसांत भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटला. तर हवेत गारवा निर्माण झाल्याने गर्मीने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. सध्या काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे बळीराजाही सुखावला आहे.