रत्नागिरी : गेले पाच ते सहा दिवस जिल्ह्याला मुसळधारपणे झोडपणाऱ्या पावसाचा आज सकाळपासून मात्र जोर ओसरल्याचं चित्र होतं.. त्यामुळे चिपळूण तसेच राजापूर बाजारपेठेतील पाणी कमी झालं होतं. मात्र सखल भागात अजूनही पुराचं पाणी आहे. चिपळूण बाजारपेठेतील पाणी कमी झालं असलं तरी नाईक कंपनी परिसरात दीड ते दोन फूट पाणी होतं. तर राजापूरमधील जवाहर चौकात अजूनही पाणी होतं.
दरम्यान गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 107.67 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस चिपळूण तालुक्यात झाला असून चिपळूणमध्ये 170 मिमी पावसाची नोंद गेल्या 24 तासांत झाली आहे. गेले तीन दिवस जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस चिपळूण तालुक्यात पडत आहे. दरम्यान गेल्या 24 तासांत गुहागरमध्ये 131 मिलिमीटर , दापोलीमध्ये 125 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर संगमेश्वर 118 मिमी, खेडमध्ये 103 मिमी, मंडणगडमध्ये 101 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.. तर राजापूरमध्ये 82 आणि रत्नागिरीत 29 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
जनजीवन हळूहळू पूर्वपदावर
मुसळधार पाऊस, नद्यांच्या पाणीपातळीत वाढ याचा सर्वाधिक फटका चिपळूण, राजापूर, संगमेश्वर, खेड शहर तसेच बाजारपेठाना बसला होता. चिपळूण आणि राजापूर शहराना तर तीन पुराच्या पाण्याचा वेढा पडला होता.. त्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं होतं.. पण आता पावसाचा जोर कमी झाल्याने पाणी ओसरत आहे. सखल भागात अजूनही पाणी आहे. पण शहारांमधील पाणी कमी झालं आहे. त्यामुळे जनजीवन हळूहळू पूर्वपदावर आहे.