रत्नागिरी : सुरुवातीला काही दिवस लांबलेल्या पावसाने आता मात्र जोर धरला आहे. गेले तीन दिवस याचा प्रत्यय या पावसाने रत्नागिरीकरांना दिला आहे. कारण गेले तीन दिवस रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसत आहे. आमावस्येच्या चार दिवस आधी पावसाने जोर धरल्याने समुद्राला देखील चांगलंच उधाण आलं आहे. जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात हायटाईडचा इशारा मिळाल्याने किनारपट्टी भागात प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र सध्या उधाणलेल्या समुद्राचं रूप पाहण्यासाठी अनेक जण किनाऱ्यावर गर्दी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. सलग कोसळलेल्या पावसामुळे बळीराजा मात्र कमालीचा सुखावला आहे. मुसळधार पावसामुळे लावणीच्या कामांना बळीराजाने सुरुवात केली आहे. असाच पाऊस बरसत राहिला तर शेतीची कामं वेळेत पूर्ण होतील अशी आशा बळीराजाला आहे. पण त्यासाठी पावसाने साथ देणं आवश्यक आहे.
दरम्यान गेल्या 24 तासांत रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी 112 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस राजापूर तालुक्यात झाला असून राजापूरमध्ये 192 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर मंडणगडमध्ये 172 मिमी, चिपळूणमध्ये 147, गुहागरमध्ये 147 मिमी तर संगमेश्वरमध्ये 86 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.