
रत्नागिरी, प्रतिनिधी : रत्नागिरी जिल्ह्यात सध्या मुसळधार पावसाची बरसात सुरूच आहे. सध्या जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. पुढील दोन दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन आणि त्यासंबंधित यंत्रणा देखील सतर्क झाल्या आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या चार – पाच दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यात अनेक नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे काही तालुक्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. तर काही ठिकाणी नुकसानीच्या घटनाही घडल्या आहेत.
24 तासात सरासरी 89.07 मिमी पावसाची नोंद
दरम्यान जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 89.07 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर एकूण 801.60 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मंडणगड तालुक्यात 102.10 मिमी, दापोली 89.20 मिमी, खेड 70.70, गुहागर 94.80 मिमी, चिपळूण 70.40 मिमी, संगमेश्वर 67.60 मिमी, रत्नागिरी 86.50 मिमी, राजापूर 99.60 मिमी,लांजा 120.70 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्हा प्रशासनाकडून दक्षता घेण्याचं आवाहन
सद्या रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पर्जन्यमान होत असुन जिल्ह्यातील अनेक नदी , नाले व ओढ्यांना पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून अनेक ठिकाणी पुल व रस्त्यांवर पुराचे पाणी वाहत आहे . सदर ठिकाणी नागरिकांनी दक्षता घ्यावी, पुलावरून पाणी जात असताना रस्ता ओलांडू नये , पुराच्या वेळी नदी , धरणाचे सांडवे , नाल्यांमध्ये पोहण्यासाठी जावू नये , विजेच्या तारां व विजेच्या खांबापासून लांब रहा. शासनाकडून दिल्या जाणा – या सूचनांचे पालन करावे. कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधवा असं आवाहन जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी केलं आहे.