
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात रविवारी आणखी 14 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे रुग्णसंख्या वाढून 270 वर पोहचली आहे. जिल्ह्यात सध्या दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या सापडण्याचा वेग वाढलेला आहे. शनिवारी संध्याकाळी 22 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यानंतर आज (रविवार) सकाळी आणखी 14 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटीव्ह आलेल्या अहवालांमध्ये रत्नागिरीतील 4 अहवाल, लांजा 3, गुहागर 3, कामथे 3 आणि दापोलीतील 1 रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची रुग्णसंख्या आता 170 वर पोहचली आहे.
आणखी एकाचा मृत्यू
कोरोनामुळे रत्नागिरी जिल्ह्यात आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. जिल्हा रुग्णालयात या व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या आता 07 वर गेली आहे.
रुग्णसंख्येत सातत्याने वाढ
1 मे पर्यंत जिल्ह्यात कोरोनाचे अवघे 6 रुग्ण होते. यातील एकाचा मृत्यू तर 5 जणांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या शून्यावर आली होती. मात्र 2 मेपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली. आणि गेल्या 30 दिवसांत तब्बल 264 रुग्ण सापडले. या रुग्णांमध्ये मुंबईतून येणाऱ्या चाकरमान्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. चाकरमान्यांची संख्या दिवसागणिक वाढत असून यामुळे कोरोनाचा फैलाव होण्याचा धोका वाढला आहे.
दरम्यान एकूण 98 कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सात जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 165 आहे.














