रत्नागिरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहता कामा नये यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना केल्या आहे.जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु असून दि. १ ते ५ एप्रिल २०२० या पाच दिवसात रत्नागिरी जिल्ह्यातील १,०७,००० शिधापत्रिका धारकांना तब्बल २५००० क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्याचा उच्चांक गाठला असल्याची माहिती रत्नागिरी चे जिल्हा पुरवठा अधिकारी महेश पाटील यांनी दिली आहे. तसेच टंचाई भासवून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येत आहे.
जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे ११.५० लाख आहेत.या लाभार्थ्यांना ९४३ स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. अंत्योदय कार्ड असलेल्या लाभार्थ्यांना अंत्योदय योजनेअंतर्गत २ रुपये किलो दराने प्रती कार्ड १० किलो गहू आणि ३ रुपये किलो दराने प्रती कार्ड २५ किलो तांदूळ दिला जातो. त्याचप्रमाणे २० रुपये किलो दराने एक किलो साखर दिली जाते.
तर बीपीएल व केशरी रेशनकार्ड असलेल्या प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना २ रु किलो दराने प्रती व्यक्ती २ किलो गहू आणि ३ रु किलो दराने प्रती व्यक्ती ३ किलो तांदूळ दिला जातो.
रत्नागिरी जिल्ह्यात या योजनेमधून सुमारे १०,००० क्विंटल गहू, १५,००० क्विंटल तांदूळ, तर १५६ क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरीत झालेले परंतु लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या सुमारे २००० शिधापत्रिका धारकांनी ते जेथे राहत आहे त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत प्रती लाभार्थी प्रती महीने ५ किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. पात्र रेशन कार्ड धारकाने नियमित स्वस्त धान्य खरेदी केल्यानंतर त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला ५ किलो अतिरिक्त तांदूळ मोफत देण्यात येणार आहे. त्यामुळे आता प्रत्येक पात्र रेशन कार्ड धारकाला नियमित धान्य घेतल्यानंतर प्रती व्यक्ती ५ किलो तांदुळ दि १० एप्रिल पासून कुटुंबातील व्यक्तींच्या संख्येनुसार मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदर योजनेकरिता तांदळाचे नियतन भारतीय खाद्य निगम कडून प्राप्त करून घेतले आहे. दि ०६ एप्रिल पासून पात्र लाभार्थ्यांना मोफत तांदळाचे वितरण सुरू करण्यात आले आहे. लाभार्थ्यांना १० एप्रिल पासून सर्व दुकानावर उपलब्ध् होईल. हे मोफत धान्य एप्रिल सोबतच मे आणि जुन मध्ये सुध्दा त्या त्या महिन्यात उपलब्ध करून दिले जाणार आहे.
जास्त दराने वस्तूंची विक्री केल्यास होणार कारवाई
जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंची आणि औषधांची कोणतीही टंचाई नाही. किराणा दुकानांमधून वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा याकरिता शासन यंत्रणा खबरदारी घेत आहे.मात्र सध्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काळाबाजार व अतिरिक्त भाव वाढीच्या अनेक ठिकाणाहून तक्रारी प्राप्त होत आहेत.जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी किंवा चढ्या दराने विक्री केल्यास सात वर्षापर्यंत कैद होवू शकते. याबाबत पुरवठा विभाग,वैध मापन शास्त्र विभाग व पोलीस यांना संयुक्त कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचे माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी महेश पाटील यांनी दिली आहे.