
रत्नागिरी : जिल्ह्याला आज पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा तडाखा बसला. खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर या तालुक्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस बरसला. विजांच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटसह जिल्ह्यात पावसाने हजेरी. अचानक बरसलेल्या या पावसाने अनेकांची तारांबळ उडाली.
गेले काही दिवस वातावरणात कमालीचा बदल झालेला आहे, त्यामुळे उष्माही वाढला होता. त्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण होतं. त्यामुळे पाऊस पुन्हा आपले रंग दाखवणार अशी चिन्ह होती. अखेर दुपारनंतर मेघगर्जनेसह पाऊस बरसायला सुरुवात झाली. सुरुवातीला खेड, चिपळूण, संगमेश्वरमध्ये मुसळधार बरसणाऱ्या पावसाने मग रत्नागिरी आणि राजापूर तालुक्यातही काही ठिकाणी वादळी-वाऱ्यासह हजेरी लावली.
विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटात जिल्ह्यातील बहुतांशी गावात मुसळधार पाऊस बरसत होता. या पावसामुळे वातावरणात मात्र गारवा आला होता..
दरम्यान या महिन्यात सलग तिसऱ्यांदा जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. आजच्या पावसामुळे आंब्यालाही फटका बसला आहे. त्यामुळे आंबा बागायतदारही चिंतेत आहेत.















