रत्नागिरी, प्रतिनिधी : राज्यातील अन्य जिल्ह्यांसह मुंबई, पुण्यात मध्ये रुग्ण संख्या कमी होत असताना, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये रुग्ण संख्या कमी होताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे हे सोमवार दि. 21 जून रोजी रत्नागिरी दौर्यावर येत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या दुसर्या लाटेत रुग्ण संख्या 45 हजारच्या पुढे जाऊन पोहचली आहे. एप्रिल व मे महिन्यामध्येच तब्बल 25 हजार रुग्ण सापडले होते. जूनच्या 16 दिवसात नव्याने दहा हजार रुग्ण सापडत आहेत. जिल्ह्यात सात दिवसांचा लॉकडाऊन झाल्यानंतरही रुग्ण संख्येत घट होताना दिसत नाही. उलट नियमित पाचशेहून अधिक रुग्ण सापडत आहेत. सध्या टेस्टिंगचे प्रमाण चार दिवसापासून वाढले असले तरी रुग्णांचा आकडा कमी होताना दिसत नाही.
येथील आरोग्य व्यवस्थेबाबत नेहमीच ओरड होताना दिसत आहे. यापार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे हे रत्नागिरी दौर्यावर येत आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते महिला रुग्णालयातील ऑक्सिजन प्लॅन्टचा शुभारंभ होणार आहे. त्याचप्रमाणे बालकांच्या कोरोना केअर सेंटरचाही शुभारंभ केला जाणार आहे.