रत्नागिरी, प्रतिनिधी : हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार जिल्ह्यात 11 व 12 जून रोजी जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता असून, जिल्ह्यात 200 मिलीमीटरपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे 11 व 12 जून या कालावधीत जिल्ह्यात संचारबंदी लावण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली आहे.
याबाबत बोलताना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्यात 11 व 12 जून रोजी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडण्याचा अंदाज आहे. 12 जूननंतर देखील पावसाचा धोका कायम असेल. त्यामुळे या कालावधीत वैद्यकीय कारणाशिवाय कोणीही बाहेर पडू नये, ग्रामकृती दल व स्थानिक प्रशासन यांच्या सूचनांचे पालन करावे असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. तसेच जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात असून एनडीआरएफच्या 2 टीम सुसज्ज ठेवण्यात आल्या असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
दरम्यान जिल्ह्यातील खेड , चिपळूण , राजापूर या तीन नगर पालिका आणि 31 गावे पूरग्रस्तत असतात.
या ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजना आखण्यात आल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. तसेच या भागातील नागरिक व ग्रामस्थांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. किनारी भागात हाय टाईड आणि पाऊस याचा धोका असल्याने किनारी भागातील ग्रामस्थांचे स्थलांतर केले जाईल. पुराचा धोका लक्षात घेऊन जनावरांना न बांधता ठेवणे , बोटी सुसज्ज ठेवणे , कुशल मनुष्यबळ तैनात ठेवणे , लाईफ बोया व इतर सामग्रीची तजवीज करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले . कोविड सेंटरच्या ठिकाणी वीज खंडित झाल्यास जनरेटर पुरवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत . तसेच ऑक्सिजन बफर साठा देखील ठेवण्यात येणार आहे . अशी माहिती देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे .