
रत्नागिरी : जिल्ह्यात सलग सहाव्या दिवशी मुसळधार पावसाची बरसात सुरूच आहे. बाप्पाच्या आगमनापासून आलेला पाऊस गेले चार दिवस मुसळधारपणे बरसत आहे. ऐन गणेशोत्सवात पावसाचा जोर वाढल्याने जिल्ह्यात दाखल झालेल्या चाकरमान्यांचेही हाल झाले आहेत. ट्रेन, बस यांचं वेळापत्रक कोलमडलंच आहे. त्यामुळे गावागावात दाखल झालेल्या चाकरमान्यांच्या आणि गावकऱ्यांच्या उत्साहावर पावसाने मात्र पाणी फेरलं आहे.
आज सकाळपासूनच जिल्ह्यात अक्षरशः धो-धो पाऊस कोसळत आहे. पाऊस पुढचे दोन दिवस असाच राहिला तर परतीच्या प्रवासाला लागणाऱ्या चाकरमान्यांच्या मार्गात मात्र विघ्न येऊ शकते.
दरम्यान गेल्या 24 तासांत उत्तर रत्नागिरीत 100 मिलिमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. मंडणगडमध्ये 125 मिमी, दापोलीत 121 तर खेडमध्ये 116 मिलिमीटर पावसाची नोंद गेल्या 24 तासांत झाली आहे. तर राजापूरमध्ये 96 मिमी, चिपळूणमध्ये 80 आणि संगमेश्वरमध्ये 77 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर गुहागर, रत्नागिरी आणि लांजा या तालुक्यांमध्येही 40 मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला आहे.