रत्नागिरी, प्रतिनिधी : जिल्ह्यात सध्या उन्हाचा कडका दिवसेंदिवस वाढत असून अनेक ठिकाणी पाणी टंचाईची झळ बसत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या वाड्यांमध्ये भर पडली आहे. सध्या 33 गावातील 51 वाड्यांमध्ये 11टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. आठ दिवसात चोवीस वाड्यांमधून टँकरची मागणी वाढली आहे.
मोसमी पाऊस उशिरापर्यंत लांबल्यामुळे जिल्ह्यात टंचाईची तिव्रता कमी राहील असा भुजल विभागाकडून अंदाज वर्तविला होता. त्यानुसार गतवर्षीच्या तुलनेत यंदा टंचाईची तिव्रता कमी आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस पहिला टँकर जिल्ह्यात धावला. सध्या नऊ पैकी सात तालुक्यात टँकर धावत आहेत. गुहागर आणि दापोली या दोन तालुक्यात अजुनही टँकरची गरज भासलेली नाही. टंचाईची तिव्रता भासू नये यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. पंधरा कोटीचा टंचाई आराखडा निश्चित करण्यात आला होता. यामध्ये पाणी योजनांसह विंधनविहीरींच्या कामांना प्राधान्य दिले गेले आहे. नळपाणी योजनांच्या दुरुस्तीची कामे सुरु झालेली आहेत; परंतु अनेक भागांमध्ये पाणी साठेचे नसल्यामुळे टँकरशिवाय पर्यायच राहीलेला नाही. यामध्ये गावापासून डोंगराळ भागातील वाड्यांचा सर्वाधिक समावेश आहे. गेल्या आठवड्यात 7 गावांमधील 33 वाड्यांना टँकरने पाणी सुरू होते. आठवडाभरात त्यात वाढ झालेली आहे. मे महिन्यात दरवर्षी ही परिस्थिती उद्भवते. पाऊस पाणी संकलन टाक्यांमुळे आतापर्यंत जिल्ह्यातील नऊ वाड्या टंचाईमुक्त करण्यात प्रशासन यशस्वी ठरले आहे.
दरम्यान रत्नागिरी तालुक्यातील 2 गावाधील 6 वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा, खेड तालुक्यातील 10 गावांमधील 19 वाड्या, लांजा तालुक्यातील 5 गावांमधील 5 वाड्या, चिपळूण तालुक्यातील 7 गावांमधील 9 वाड्या, मंडणगड तालुक्यातील 1 गावातील 1 वाडी, संगमेश्वर तालुक्यातील 7 गावांमधील 10 वाड्या, राजपूर तालुक्यातील 1 गावातील 1 वाडीला टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे