रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार संघाने प्रतिवर्षाप्रमाणे पत्रकार पुरस्कारांची घोषणा केली आहे. मराठी पत्रकार दिनानिमित्त शुक्रवारी दि. ६ जानेवारीला दुपारी १२ वाजता या पुरस्कारांचे वितरण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात होणार आहे. या वेळी प्रमुख पाहुण्या म्हणून अप्पर जिल्हाधिकारी सौ. शुभांगी साठे उपस्थित राहणार आहेत.
मराठी वृत्तपत्राचे जनक, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठीतील सर्वात पहिले वृत्तपत्र 6 जानेवारी रोजी सुरू केले. या कारणामुळे हा दिवस महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. याचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार संघ गेली अनेक वर्षे विविध पुरस्कारांचे वितरण करीत आहे. ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर, पत्रकार सौ. सोनाली सावंत, पत्रकार राकेश गुडेकर, कॅमेरामन नीलेश कदम यांना त्यांच्या योगदानाबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच संघातर्फे प्रतिवर्षाप्रमाणे विशेष पुरस्कार डॉ. विनोद सांगवीकर यांना प्रदान करण्यात येईल. मानपत्र आणि पुस्तक असे पुरस्काराचे स्वरूप आहे. याप्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांनाही सन्मानित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्ष मेहरून नाकाडे, सचिव राजेश कळंबटे व सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.