रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर, दापोली नंतर आता गुहागर आणि चिपळूणमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रामदास राणे यांनी आज गुहागरमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. हा अर्ज आपण भाजपकडून भरल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तर चिपळूणमध्ये सुद्धा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तुषार खेतल यांनी शक्तिप्रदर्शन करत आपला अर्ज दाखल केला.
रत्नागिरी जिल्हयात विधानसभेच्या एकूण 5 जागा आहेत. यापैकी किमान 2 जागा युतीत भाजपला मिळाव्यात अशी मागणी स्थानिक भाजपने वरिष्ठांकडे केली होती. मात्र पाचही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्या. त्यामुळे नाराज झालेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला आहे. दापोलीत भाजपच्या केदार साठे यांनी दोन तीन दिवसांपूर्वी आपला अर्ज दाखल केला आहे. राजापूरमध्ये भाजप कार्यकर्ते गांगण यांनी आपला अर्ज दाखल केला होता. त्यानंतर शुक्रवारी गुहागरमध्ये रामदास राणे आणि चिपळूणमध्ये तुषार खेतल यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. रामदास राणे यांच्या उमेदवारी अर्जामुळे गुहागरमधील महायुतीचे उमेदवार भास्कर जाधव यांच्यासमोर मोठं आव्हान आहे. आमच्या भावना पक्षनेतृत्व समजून घेऊन अशी प्रतिक्रिया रामदास राणे व्यक्त केली आहे. दरम्यान भाजप आता या नाराज कार्यकर्त्यांची समजूत कशी काढतं याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.