रत्नागिरी, (आरकेजी) : जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक काल पार पडल्यानंतर सर्वांचं लक्ष लागलं होतं ते जिल्हा परिषदेच्या चार विषय समिती सभापतीपदांसाठी निवडीकडे. मात्र ही निवड प्रक्रिया अखेर बिनविरोध पार पडली. विशेष म्हणजे चिपळूण विधानसभा मतदार संघाच्या वाट्याला 2 आणि रत्नागिरीच्या वाट्याला 2 सभापतीपदे आली आहेत. रत्नागिरी तालुक्याच्या वाट्याला समाजकल्याण, व महिला बालकल्याण तर चिपळूण विधानसभा मतदार संघात अर्थ व शिक्षण सभापती तसेच बांधकाम व आरोग्य सभापतीपदे देण्यात आली आहेत.
मंगळवारी अध्यक्षपदी लांजाच्या स्वरूपा साळवी यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर उरलेल्या सभापतीपदांसाठी सत्ताधारी शिवसेनेकडून इच्छुकांमधून कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष वेधलेले होते. इच्छुकांच्या शर्यतीत संमगेश्वर मधील धामापूर जि.प.गटातील सहदेव बेटकर, चिपळूण अलोरे गटातील विनोद झगडे, खेडमधून सुनील मोरे, गुहागरमधून महेंद्र नाटेकर, रत्नागिरीमधून पकाश रसाळ, सौ. साधना साळवी यांच्या नावांचा समावेश होता. त्यावेळी शिवसेनेतील वरिष्ठ स्तरावरून या निवडीवेळी चिपळूण विधानसभा मतदार संघातील अलोरे, धामापूर तर रत्नागिरी या तालुक्यांना सभापतीपदांसाठी संधी देण्याचा निर्णय वरिष्ठ स्तरावरून घेण्यात आला.
त्यामुळे या निवडीवेळी बुधवारी इच्छुकांच्या मनधरणीनंतर शिवसेनेकडून अर्थ व शिक्षण समिती सभापतीपदासाठी सहदेव बेटकर, समाजकल्याण समिती सभापतीपदासाठी पकाश रसाळ, परशु कदम, बांधकाम व आरोग्य समिती सभापतीपदासाठी विनोद झगडे, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदासाठी साधना साळवी यांचे उमेदवारी अर्ज सादर करण्यात आले. अर्ज छाननीवेळी पाचही अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी अमित शेडगे यांनी वैद्य ठरविले. मात्र माघार घेण्याच्या मुदतीत समाजकल्याण सभापतीपदासाठी दाखल केलेल्या दोन अर्जापैकी सदस्य परशु कदम यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे ही निवडप्रक्रिया बिनविरोध पार पडली.
यावेळी शिवसेना जिल्हापमुख राजेंद्र महाडिक, तालुकापमुख बंड्या साळवी, गटनेते उदय बने, जि.प.अध्यक्षा स्वरूपा साळवी, उपाध्यक्ष संतोष थेराडे, उपजिल्हापमुख महेश उर्प बाबू म्हाप, माजी अध्यक्ष जयसिंग उर्प आबा घोसाळे, माजी सभापती दिपक नागले, सदस्य संतोष गोवळे, रोहन बने, महेंद्र नाटेकर, माजी अध्यक्षा तथा विद्यमान सदस्या रचना महाडिक, माजी अध्यक्षा स्नेहा सावंत, संगमेश्वर तालुकापमुख पमोद पवार, माजी बांधकाम सभापती अण्णा कदम आदी मान्यवरांची उपस्थिती होती.