रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): जिल्ह्यातील २१५ ग्रामपंचायतीपैकी १४८ ग्रामपंचायतींसाठी सोमवारी निवडणूक होणार आहे. यापैकी २९ ग्रामपंचायती या सरपंच तर २३ ग्रामपंचायतीत सदस्यासाठी मतदान घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ४७३ मतदान केंद्रे यासाठी निश्चित करण्यात आली असून एकूण १ लाख ९४ हजार २१५ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासनाबरोबरच पोलीस प्रशासनही सज्ज झाले आहे. दरम्यान, यापूर्वी ६७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.
आगामी निवडणुकांच्या दृष्टीने ग्रामपंचायत निवडणुकांना विशेष महत्व आहे. जास्तीत जास्त ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठी सर्वपक्षीयांनी जोरदार प्रचार मोहीम राबवली आहे. त्यामुळे जनतेचा कौल कोणत्या पक्षाच बाजूने राहतो, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. प्रथमच सरपंचपदासाठी थेट निवडणूक होणार असल्याने, या निवडणुकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. जिल्ह्यात २१५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया १६ ऑक्टोबर रोजी होणार आहे. सरपंचपदासाठी ४०८ तर सदस्यपदासाठी २०३३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. २१५ ग्रामपंचायतींपैकी १४८ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक, तर २९ ग्रामपंचायतींमध्ये केवळ सरपंचपदासाठी आणि २३ ग्रामपंचायतींमध्ये केवळ सदस्यपदासाठी मतदान होणार आहे. यासाठी जिल्ह्यात ४७३ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर एक बॅलेट युनिट आणि एक कंट्रोल युनिट देण्यात येणार आहे. सकाळी ७.३० ते सायं. ५.३० या वेळेत मतदान होईल. प्रत्येक केंद्रावर ५ कर्मचारी तैनात करण्यात आले असून, त्यात केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, शिपाई, पोलीस कर्मचारी यांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात १३, दापोली-१८, खेड-९, गुहागर-१४, चिपळूण-१७, संगमेश्वर-२१, रत्नागिरी-२१, लांजा-१६ आणि राजापूर तालुक्यात १९ ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे़.
जिल्ह्यात संगमेश्वर तालुक्यातील शिरंबे ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदासाठी तसेच १३ सदस्यपदासाठी एकही अर्ज प्राप्त झालेला नाही. तर चिपळूण आणि राजापूर तालुक्यात प्रत्येकी ६, रत्नागिरी तालुक्यात ५, लांजा तालुक्यात ९ सदस्यपदासाठी अर्ज प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे येथील सदस्यपद रिक्त राहणार आहे. त्यामुळे या ठिकाणी पुन्हा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे़.
मतदानासाठी चोख पोलीस बंदोबस्त
८२ पोलीस अधिकारी, ५०७ पोलीस कर्मचारी, ३०० होमगार्डसह शीघ्र कृतीदल तैनात मतदानाच्या दिवशी जिल्ह्यात कोठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे़. उपविभागीय पोलीस अधिकारी-४, पोलिस निरीक्षक-१८, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक-६० अशा एकूण ८२ पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीला ५०७ पोलीस कर्मचारी, ३०० होमगार्ड, २ आरसीपी प्लॅटून, १ क्युआरटी आणि एसआरपीएफ जी १ कंपनी तैनात करण्यात आली आहे़.
११ ग्रामपंचायती संवेदनशील
जिल्यातील ११ ग्रामपंचायत संवेदनशील म्हणून घोषीत केल्या आहेत. या ठिकाणी पोलीस प्रशासनाची विशेष नजर राहणार आहे़ या ग्रामपंचायतीमध्ये गुहागर तालुक्यातील आरे-वाकी-पिंपळवट, पांगारी-हवेली, आबलोली, पाटपन्हाळे, खेड तालुक्यातील संगलट, घाणेखुंट, तिसंगी, मंडणगड तालुक्यातील बाणकोट, वेसवी, दापोली तालुक्यातील जालगांव, तर रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे ग्रामपंचायतीचा समावेश आहे.