रत्नागिरी (आरकेजी): प्रथमच झालेल्या थेट सरपंचपदासह ग्रामपंचायत सदस्यांचा निकाल मंगळवारी लागला. या निवडणुकीत शिवसेनेचे वर्चस्व कायम तर काही ठिकाणी भाजप पुरस्कृत उमेदवार निवडून आले. १४८ ग्रामपंचायतीपैकी शिवसेनेकडून १०० पेक्षा अधिक तर भाजपाकडून ४७ पेक्षा अधिक सरपंच झाल्याचा दावा दोन्ही पक्षांनी केला आहे. दरम्यान, ६७ ग्रामपंचायती यापूर्वी बिनविरोध झाल्या आहेत.
रत्नागिरीत शिवसेनेचे २१ ठिकाणी थेट सरपंच निवडून आले आहेत. तर भाजपाचे ८ ठिकाणी सरपंच विराजमान होणार आहेत. याठिकाणी २९ ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक पार पडली. राजापूर तालुक्यात २५ ग्रामपंचायतीत १५ ठिकाणी सेनेचे सरपंच विराजमान होणार असून २ ठिकाणी सेना बंडखोर निवडून आले आहेत. पाचल ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी पुरस्कृत गाव पॅनलचे वर्चस्व दिसून आले आहे. तळवडे गावपॅनलचा सरपंच निवडून आला आहे. जुवाठी,आजिवली येथे काँग्रेसचे सरपंच विराजमान होणार आहे.
चिपळूण तालुक्यात राष्ट्रवादी पुरस्कृत गावपॅनलचे वर्चस्व दिसून आले आहे. याठिकाणी १३ ठिकाणी गावपॅनलचे सरपंच विजयी झाले आहेत. लांजा तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेने जोरदार मुसंडी मारत १९ पैकी ११ ग्रामपंचयतीवर भगवा फड़कला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपने गाव विकास आघाडीचा आधार घेत आपल्या अस्तित्वासाठी लढावे लागले. खेड तालुक्यात ९ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासह ग्रामपंचायत सदस्यांच्या पदासाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ७ ग्रामपंचायतींवर सेनेने विजय मिळवला आहे. याही निवडणुकीत भाजपाला खातेही उघडता आले नाही. गुहागर तालुक्यातील १४ ग्रा.पं.च्या झालेल्या निवडणूकीत थेट सरपंच निवडी अतितटीच्या झाल्या. तालुक्यात भाजप, राष्ट्रवादीने प्रत्येक जागेवर दावा केला आहे. बहुसंख्य ठिकाणी गाव विकास आघाडी सत्तेवर आल्याचे दिसत आहे.
दापोलीत निवडणूक झालेल्या १८ ग्रामपंचायतींपैकी १० ग्रामपंचायतींवर शिवसेनेने सरपंच पदावर कब्जा असून ८ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच निवडून आल्या आहेत. तालुक्यात पुन्हा एकदा सेनेचा आवाज दिसून आला. संगमेश्वरात २० ग्रा.पं. च्या निवडणूकीत १५ ठिकाणी शिवसेनेने दावा केला असून भाजपनेही २० पैकी १२ ठिकाणी विजयी झाल्याचा दावा केला आहे. मंडणगड तालुक्यात पार पडलेल्या १३ ग्रा. पं. मध्ये निवडणूकीत १० ठिकाणी शिवसेनेचे वर्चस्व दिसून आले असून तीन ठिकाणी गाव पॅनलचे सरपंच निवडून आले आहेत.