नवी दिल्ली : रत्नागिरी गॅस आणि ऊर्जा प्रकल्पामधून वायू आधारीत ऊर्जा निर्मिती केली जात आहे. २०१५-१६ आणि २०१६-१७ या वर्षांमध्ये या प्रकल्पातून ऊर्जा निर्मिती केली असल्याची माहिती ऊर्जा, कोळसा आणि खाण मंत्री पीयूष गोयल यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली.
रत्नागिरी ऊर्जा प्रकल्पाकडून १ एप्रिल २०१७ पासून ५०० मेगावॅट ऊर्जा अखंडितपणे पाच वर्षे खरेदी करण्यात येईल, असे रेल्वेने मान्य केले आहे. तसेच या प्रकल्पाला येणारा ऊर्जा वितरणासाठी लागणारा खर्च आणि त्यामध्ये होणारे नुकसान तसेच व्हॅट कर माफ करण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्यानेही तत्वत: मान्य केले आहे, असेही गोयल यांनी यावेळी सांगितले.
रत्नागिरी गॅस आणि ऊर्जा प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनासाठी सरकारने केलेल्या उपाय योजनांची माहिती मंत्र्यांनी यावेळी दिली.
या प्रकल्पाला अंदाजे ८,९०६ कोटींचे कर्ज झाले आहे. मात्र, बँका आणि वित्तीय संस्थांनी कर्ज परतफेडीसाठी मुदतवाढ दिली असून, त्याची फेरआखणी केली आहे. ‘गेल’ कंपनीला रत्नागिरी ऊर्जा प्रकल्पातून पाच वर्षे ठराविक दराने गॅस पुरवठा करणार आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.