रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या अटीतटीच्या लढतीत शिवसेना उमेदवार प्रदीप उर्फ बंडया साळवी यांनी भाजप उमेदवार ऍड दीपक पटवर्धन यांचा 1092 मतांनी पराभव केला. या पोटनिवडणूकित भाजपचा धुव्वा उडविल्यानंतर शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. शिवसेनेचे प्रदीप उर्फ बंड्या साळवी, भाजपचे ऍड.दीपक पटवर्धन, राष्ट्रवादीचे मिलिंद कीर व मनसेचे रुपेश सावंत हे निवडणूक रिंगणात असल्याने निवडणूक चौरंगी झाली. भाजपनेही या निवडणुकीत दिग्गज नेते उतरवले होते.
तत्कालीन नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्या राजीनाम्यानंतर रत्नागिरी नगर परिषदेची पोटनिवडणूक जाहीर झाली. राज्यातील सत्ता संघर्षानंतर त्याचे पडसाद स्थानिक पातळीवर देखिल उमटले होते. राज्यात महाराष्ट्र महाविकास आघाडी झाल्यानंतर रत्नागिरीत स्थानिक पातळीवर आघाडीत बिघाडी झाली होती. सर्वच राजकीय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे प्रचाराची धुळवड चांगलीच उडाली होती. गेले महिनाभर शहरात निवडणुकीचा ज्वर पहायला मिळाला. कुठे रोड शो तर कुठे प्रभागवार बैठका तर काही ठिकाणी वैयक्तिक भेटी गाठी घेऊन प्रचार करण्यात आला. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि मनसे हे चार पक्ष निवडणुकीच्या रिंगणात होते.
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे प्राबल्य आहे. नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती आदी ठिकाणी एकहाती वर्चस्व आहे. शिवसेनेच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी भाजपने व्युव्हरचना आखली होती. त्यानुसार भाजपची अख्खी फौज निवडणूकिच्या प्रचारात उतरली होती. त्यामध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे, विधानपरिषद विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, आमदार संजय केळकर, रवींद्र चव्हाण, निरंजन डावखरे, चित्राताई वाघ असे दिगज्ज नेते या निवडणुकीत उतरवले होते तसेच भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड याठिकाणी तळ ठोकून होते.
या पोटनिवडणूकिसाठी शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याने मतदानाची टक्केवारी घसरली. फक्त 47.38 टक्के मतदान झालं.
सोमवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातिच्या दोन फेऱ्यांमध्ये शिवसेना उमेदवार प्रदीप साळवी यांनी 1763 मतांची आघाडी घेतली होती. मात्र पुढील तीन फेऱ्यांमध्ये भाजप व राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी हे लीड तोडलं. मात्र अंतिम फेरीत 1092 मतांनी शिवसेनेच्या प्रदीप उर्फ बंडया साळवी यांनी विजय मिळवला. बंडया साळवी यांना 10007, भाजपच्या ऍड दीपक पटवर्धन यांना 8915, तर राष्ट्रवादीच्या मिलिंद किर 8252, तर मनसेच्या रुपेश सावंत 419, तर नोटाला 354 मतदारांनी पसंती दिली.
विजयाची घोषणा होताच शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. शहरात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. त्यानंतर बाजारपेठेत विजयी रॅली काढण्यात आली.