रत्नागिरी (आरकेजी): शिक्षण खात्यातील बदली प्रकरणाची संभाषण क्लिप वायरल झाल्यानंतर शिक्षण सभापतींनी चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणाचा अहवाल आठ दिवसांत सादर करावा, असे निर्देश शिक्षण विभागाला दिले आहेत. जिल्ह्यातील शिक्षण संघटनांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती.
जिल्हा बाह्य बदलीसाठी २२ हजार रुपये दिल्याचे दोन शिक्षकांमधील मोबाईलवरील व्हायरल नुकतेच प्रसारित झाले होते. हा प्रकार गंभीर असून याप्रकरणाची चौकशी करावी, अशी जोरदार मागणी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटनांकडून करण्यात आली होती. यावेळी एप्रिल २०१८ आणि मे २०१८ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा बाह्य बदल्यांचा आकडा धक्कादायक आहे. या बदल्यांमध्ये ७५० हून अधिक शिक्षकांना जिल्ह्याबाहेर बदली देण्यात आली. त्यामुळे तब्बल २० टक्के शिक्षकांचा तुटवडा या बदल्यांमुळे जिल्ह्यात जाणवत असल्याचे शिक्षक संघटनांकडून सांगण्यात आले. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस दिलीप देवळेकर यांनी केली आहे.
दरम्यान या व्हारल झालेल्या क्लिप संदर्भात रत्नागिरी जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती सहदेव बेटकर यांनी चौकशीचे आदेश दिले आहे. येत्या आठ दिवसात शिक्षण विभागाकडून या संदर्भातील चौकशी अहवाल त्यांनी मागवला आहे.