रत्नागिरी,(विशेष प्रतिनिधी) : मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी आज पुकारलेल्या रत्नागिरी जिल्हा बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर परिसरात रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन करण्यात आले. नेहमी गजबजलेले रस्ते सामसूम होते.
रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथील ठिय्या आंदोलनानंतर मराठा समाज बांधवांनी भव्य मोर्चा काढला. मारुती मंदिर परिसरातून निघालेल्या या भव्य मोर्चात मोठ्या प्रमाणात महिला भगिनी यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मारुती मंदिर, माळ नाका, जयस्तंभ, आठवडा बाजार परिसर घोषणांनी दुमदुमून गेला होता. बाजारपेठेतून हा मोर्चा पुन्हा जयस्तंभ इथं आल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
मराठा आंदोलकांनी मुंबई-गोवा महामार्ग हातखंबा इथे रोखून धरला. मंडणगड, खेड, गुहागर, चिपळूण आणि संगमेश्वर तालुके जिल्हा बंदमध्ये सहभागी झाले नव्हते. यापूर्वी या तालुक्यांमध्ये 100 टक्के बंद करण्यात आले होते, तसेच येत्या 9 ऑगस्टला होणार्या महाराष्ट्र बंदमध्ये सहभाग घेण्यात येणार असल्यामुळे हे तालुके आजच्या रत्नागिरी जिल्हा बंदमध्ये सहभागी झाले नव्हते. दापोलीतील दुःखद घटनेमुळे दापोली तालुका या बंदमध्ये सहभागी झालेला नव्हता.
शुक्रवारी रत्नागिरीत कडकडीत बंद पाळण्यात आला, या बंदच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात फौज फाटा तैनात करण्यात आला होता.
शुक्रवारी सकाळपासूनच महामार्गासह प्रमुख बाजरपेठा सुन्न होत्या. ठिकठिकानी मराठा बांधव रस्त्यावर उतरल्याने वाहतूक खोळंबली होती. रत्नागिरी शहरात सकाळी 10 वाजता आंदोलनाला सुरुवात झाली, सकल मराठा समाजाच्या बॅनरखाली आंदोलनाला सुरुवात झाली. यावेळी सर्वपक्षीय नेतेमंडळी आंदोलनात सहभागी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. मारुती मंदिर परिसरात आंदोलकानी वेढा देऊन संपूर्ण शहराची वाहतूक व्यवस्थाचं बंद पाडली. यावेळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधव ठिय्या मांडून होते. सारा परिसर घोषणांनी दुमदुमला.
आज नेहमी गजबजलेल्या रस्त्यांवर शुकशुकाट होता. ज्या ठिकाणी नेहमी वर्दळ असायची अशी सर्वच ठिकाणं, बाजारपेठ बंद होती. बंदमुळे रत्नागिरी, राजापूर आणि लांजा तालुक्यातील एसटी सेवाही बंद होती.
मराठा आंदोलकांनी आज मुंबई गोवा महामार्ग हातखंबा इथे रोखून धरला होता. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक काही काळ ठप्प होती. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज रत्नागिरी जिल्ह्याल सकल मराठा समाजाने जिल्हा बंदची हाक दिली होती. रत्नागिरीतील ठिय्या आंदोलन आणि त्यानंतर शहरातून काढलेल्या मोर्चानंतर आंदोलकानी मुंबई गोवा माहामार्गावर रास्ता रोको केला. जवळपास अर्ध्या तासाहून अधिक वेळ आंदोलकांनी महामार्गावर ठिय्या आंदोलन केलं. माजी खासदार निलेश राणे हे सुद्धा या रास्ता रोको आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा यावेळी लागल्या होत्या. यावेळी जोरदार घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
या आंदोलनात सहभागी झालेल्या बांधवांनी आरक्षणाबाबत आपली परखड मतं व्यक्त केली. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक म्हणाले की ज्यांनी स्वराज्याला दिशा दिली, त्यांचे मावळे आज रस्त्यावर उतरले आहेत. शिवाजी महाराजांनी दिल्लीचे तख्त हलविले होते, तीच ताकद या मराठा बांधवांमध्ये आहे, आमचा अंत पाहू नका असा इशारा राजेंद्र महाडिक यांनी दिला.
मुख्यमंत्र्यानी मराठ्यांचा अंत पाहू नये – निलेश राणे
रत्नागिरीत सकल मराठा समाजाचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी पुढाकार घेऊन या आंदोलनाला दिशा दिली. यावेळी बोलताना राणे म्हणाले की मुख्यमंत्र्यानी मराठ्यांचा अंत पाहू नये. हे सर्व शिवबाचे मावळे आहेत, हे मावळे आता पेटलेत, पुढचे पाऊल उचलले तर महाराष्ट्रात मराठ्यांना आवरण्यासाठी पोलीस फौज कमी पडेल असा निर्वाणीचा इशाराच माजी खासदार निलेश राणे यांनी यावेळी दिला. मराठा समाजाची ताकद संपूर्ण महाराष्ट्राला कळली आहे असे सांगून राणे पुढे म्हणाले की केवळ आश्वासने नकोत आरक्षण जाहीर करा, जोपर्यंत 16 टक्के आरक्षण मिळत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही. आजवर खूप सोसलं आहे. वेळ निघून गेलीय, आता आयोग वगेरे सर्व बाजूला ठेवा.
सरकार आरक्षणाबाबत लवकरच निर्णय घेईल – उदय सामंत
ठिय्या आंदोलनात सहभागी झालेल्या आमदार उदय सामंत यांनी आंदोलनाला जाहीर पाठींबा देत नेहमी सकल मराठा समाजाच्या पाठीशी उभं राहण्याचा विश्वास आंदोलकांना दिला. राज्यभरात सुरु असलेली मराठा समाजाची आंदोलनं पाहून राज्य सरकार आरक्षणाबाबत लवकरच निर्णय घेईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.