रत्नागिरी, प्रतिनिधी :- डेंग्यू- मलेरियाने गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात थैमान घातले होते. मात्र, यंदा ही डेंग्यूची साथ आटोक्यात आली असून केवळ २१ रुग्ण सापडले; तर एकाही रुग्णांच्या मृत्यूची नोंद नसल्याची आकडेवारी जिल्हा आरोग्य यंत्रणेने जाहीर केली आहे. मागील वर्षी २२९ रुग्ण आढळले होते.
जिल्ह्यात तापसरी, डेंगी, मलेरिया या साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यात जिल्हा अजूनही कोरोनातून भयमुक्त झालेला नाही. मात्र, डेंगीच्या साथीची भीती कायम होती. ती आता काहीशी कमी झाल्याचे दिसून येत आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा हिवताप विभागाकडून मोठ्या प्रमाणात डेंगीबाबत जनजागृती करण्यात आली. या मोहिमेच्या माध्यमातून डेंगीच्या निर्मूलनासाठी विविध कार्यक्रम राबविले. माध्यमातूनही जनजागृती होताना दिसत आहे.
जिल्ह्यात २०१९ मध्ये डेंगीचे २२९ रुग्ण आढळले होते. मात्र, आरोग्य विभागाकडून त्या रुग्णांवर वेळीच उपचार केल्याने एकही रुग्ण दगावला नव्हता. त्यानंतर जानेवारी २० पासून आतापर्यंत जिल्ह्यात ८० संशयित रुग्ण आढळले. त्यापैकी डेंगीचे २१ रुग्ण मिळाले. त्यात स्थानिक १२ रुग्ण आणि स्थलांतरित नऊ रुग्ण आहेत. डेंगी हा ‘एडीस् इजिटी’ या डासापासून होतो. डेंगी तापाकडे दुर्लक्ष झाल्यास तो जीवघेणा ठरू शकतो. यासाठी गप्पी माशांची पैदास केंद्रे तयार केली आहेत.
खासगी रुग्णालयांतून चालढकल
जिल्ह्यात डास निर्मूलनाचा कार्यक्रम राबविण्यात येतो. तसेच, डेंगीच्या रुग्णांबाबत खासगी रुग्णालयांनाही सूचना दिल्या आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयांत डेंगीचा रुग्ण आढळल्यास तत्काळ आरोग्य विभागाला माहिती कळविली पाहिजे. मात्र, ती देण्यास चालढकल होते.
“जिल्ह्यात इको फ्रेंडली डास निर्मूलन कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. कोरडा दिवस पाळला जातो. त्याचबरोबर कंटेनर सर्वेक्षण करून पॉझिटिव्ह आढळून आल्यास तेथे कीटकनाशकांची फवारणी केली जाते.”
-डॉ. संतोष यादव, जिल्हा हिवताप अधिकारी, रत्नागिरी