रत्नागिरी : जिल्ह्यातील डॉक्टरांचे सर्व्हेक्षण करुन बोगस डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करा अशा सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज झालेल्या बोगस डॉक्टर पुनर्विलोकन समितीच्या बैठकीत दिल्या.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. ए.एस.बोल्डे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी.एस.ठोंबरे, पोलीस निरीक्षक शिरीष सासणे, यावेळी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या डॉ. संघमित्रा फुले, डॉ. चव्हाण आदी उपस्थित होते.
पोलीस व आरोग्य यंत्रणेने समन्वय साधून बोगस डॉक्टरांवर कारवाई करणे आवश्यक आहे. वैद्यकीय व्यवसायाच्या प्रमाणपत्राचे दर पाच वर्षानी नुतनीकरण करणे सक्तीचे आहे तसेच वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांनी आपल्या दवाखान्याच्या नामफलकावर आपली पदवी नमूद करावी सदर बाबींची खात्री पुनर्विलोकन समितीने करणे अत्यंत आवश्यक असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले.
दक्षता समिती सभा संपन्न
गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र अधिनियम 1994 जिल्हा दक्षता समितीची सभा आज जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. ए.एस.बोल्डे, जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या डॉ. संघमित्रा फुले, आस्था सोशल फाऊंडेशनच्या सुरेखा जोशी-पाथरे, डॉ. प्राची औरंगाबादकर, डॉ. नाफडे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यामध्ये एकूण 104 मंजूर सोनोग्राफी केंद्र असून त्यापैकी 69 केंद्रावर गर्भवती मातांची सोनेाग्राफी तपासणी केली जाते. पीसीपीएनडीटी अंतर्गत सोनोग्राफी सेंटर्सची तिमाही तपासणी करण्यात यावी अशा सूचना जिल्हाधिकारी चव्हाण यांनी संबंधितांना दिल्या. तसेच जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयामध्ये सोनोग्राफी मशिनची व्यवस्था नाही तेथे लवकरच नवीन सोनोग्राफी मशिन्स उपलब्ध करुन दिल्या जातील असेही त्यांनी बैठकीत सांगितले.