रत्नागिरी : काही अज्ञात शिकाऱ्यांनी बिबट्याची शिकार केल्याची घटना उघडकीस आली आहे. रत्नागिरी तालुक्यातील वरवडे मराठवाडी परिसरात हा प्रकार घडला. अज्ञात शिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मराठवाडीतील ग्रामस्थांना आज सकाळी हा बिबट्या या ठिकाणी पडलेला दिसला. पुढे जाऊन पाहिल्यानंतर तो मृत असल्याचं काही ग्रामस्थांच्या लक्षात आलं. घटनेची माहिती गावक-यांनी पोलीस पाटील यांना दिली. पोलीस पाटलांनी देखील तातडीने याबाबतची माहिती रत्नागिरी वन विभागाला कळविली. वन विभागाची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली.
पंचनामा केल्यानंतर या बिबट्याची शिकार झाल्याचं निष्पन्न झालं आहे. बिबट्याच्या मानेजवळ बंदुकीने मारा केलेल्याच्या खुणा देखील सापडल्या होत्या. तातडीने बिबट्याचं पोस्टमार्टम करण्यात आलं व त्यावेळी बिबट्याच्या शरीरात काडतुसमधील दोन छरे सापडले आहेत. मृत बिबट्याचं अंदाजे वय तीन वर्ष असून, त्याची शिकार पहाटेच्या दरम्यान करण्यात आली असल्याचा अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे. अज्ञात शिका-याविरोधात वन्य जीव संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत वन विभागाने गुन्हा दाखल केला आहे.