
रत्नागिरी, (आरकेजी) : आपण स्वामी समर्थांचा अवतार असल्याचे सांगून भोंदूगिरी करणाऱ्या रत्नागिरीतल्या पाटील बुवाला अटक करण्यात आली आहे. रात्री दीडच्या सुमारास अटक रत्नागिरी शहर पोलिसांच्या पथकाने के सी जैन नगर परिसरात त्याला अटक केली. त्यानंतर आज त्याला ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दुपारी तीन वाजता त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची 15 हजारांच्या जामिनावर मुक्तता केली.
बुधवारी पाटील बुवाविरोधात गुन्हा दाखल झाला. ग्रामीण भागातील एका महिलेने बुवाविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर कारवाई करण्यात आली.
काही दिवस रत्नागिरी तालुक्यातल्या झरेवाडी इथल्या मठातून श्रीकृष्ण अनंदा पाटील उर्फ पाटील बुवा भोंदूगिरी करत होता. त्याच्या कारनाम्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामध्ये महिलांना अश्लील शिव्या, तसेच अनेक आक्षेपार्ह गोष्टी दिसून आल्या. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे बुवावर कारवाई करावी असे पत्रही रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याला देण्यात आले होते. प्रत्यक्ष कोणी पीडित तक्रार करण्यास पुढे येत नव्हता. बुधवारी एका पीडित महिलेने या बुवासह आणखी एका विरोधात तक्रार दिली.
फिर्यादी महिलेच्या मुलास आकडीचा आजार असल्याने सप्टेंबरमध्ये ती झरेवाडी येथील बुवाच्या मठात गेली होती. त्यावेळी बुवाने तिला आश्लिल शिवीगाळ केली. याबाबत या महिलेने मठातल्या जयंत रावराणे यांना सांगितलं. त्यांनीही दमदाटी केली. अखेर बुधवारी महिलेने रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली.