रत्नागिरी : नाताळच्या सुट्टीमुळे पर्यटकांनी कोकणची वाट धरली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनारे पर्यटकांनी गजबजून गेले आहेत.रत्नागिरी जिल्ह्यातील विस्तीर्ण व स्वच्छ समुद्रकिनारे, नारळी-पोफळींच्या बागा, मंदिरे, ऐतिहासिक ठिकाणं, डोंगर दऱ्यातून वसलेली टुमदार घरं, याचं पर्यटकांना नेहमीच अप्रुप राहिले आहे. निळाशार समुद्र किनारा आणि इथलं सौंदर्य अनेक पर्यटकांना आकर्षित करतं. त्यामुळे अलीकडच्या काळात गोव्यापाठोपाठ अनेकांची पसंती कोकणाला असते. सध्याही काहीशी अशीच स्थिती आहे. नाताळची सुट्टी लागल्याने अनेकांनी कोकणची वाट धरली आहे. राज्यभरातील विविध भागांतून पर्यटकांचा ओघ जिल्ह्यात सुरू झाला आहे. त्यामुळे कोकण पर्यटकांनी हाऊसफुल्ल झालं आहे. एमटीडीसीची सर्व रिसॉर्ट आणि हॉटेल्स फुल झाली आहेत. राज्यासह देश विदेशातील पाहुण्यांनीही समुद्र किनार्यांनाच जास्त पसंती दिली आहे. त्यामुळेच रत्नागिरीतील किनारे पर्यटकांनी गजबजले असल्याचं चित्र आहे. जिल्ह्यातील हर्णे, दापोली, मुरुड, गुहागर, गणपतीपुळे, मालगुंड, आरे-वारे, भाट्ये, मांडवी असे सर्वच किनारे सध्या हजारो पर्यटकांनी गजबजून गेले आहेत. वॉटर स्पोर्टस्, हवाई सफर, समुद्रातील मज्जा अशात सध्या अनेक पर्यटक गुंतले आहेत. समुद्राच्या पाण्यात भिजण्याची मज्जा सुद्धा अनेक पर्यटक घेताना दिसत आहेत. बच्चे कंपनी बरोबरच त्यांचे पालकही समुद्रकिनार्यावर पाण्यात मस्त बागडताना दिसतात. रत्नागिरी नजीकच्या गणपतीपुळेच्या मंदिरा समोरील किनाराही पर्यटकांनी फुलून गेला आहे.पुढचे काही दिवस ही गर्दी अशीच राहणार आहे.















