
रत्नागिरी : रत्नागिरीतील विमानतळाच्या विस्तारीकरणाला मिरजोळे आणि शिरगाववासीयांनी आपला विरोध कायम ठेवला आहे. जिल्हा परिषदेतील लोकनेते श्यामरावजी पेजे सभागृहात प्रशासन आणि मिरजोळे व शिरगाव ग्रामस्थांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला प्रांताधिकारी अमित शेडगे, कोष्टकार्डचे अधिकारी, मिरजोळे सरपंच गजानन गुरव, शिरगाव सरपंच वैशाली गावडे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मिरजोळे गावातील एमआयडीसी आणि कोकण रेल्वेसाठी 1 हजारहून अधिक एकर जमीन यापूर्वीच शासनाने घेतली आहे. उर्वरित जमिनींपैकी घर बांधण्यासाठी उपयुक्त असलेली जमीन आता विमानतळासाठी जात आहे. त्यामुळे गावात निवासासाठी जमीनच राहणार नाही, अशी खंत व्यक्त करत नागरी वाहतूक विमान सेवेअंतर्गत होत असलेल्या विमानतळाच्या विस्तारीकरणाला दोन्ही गावातील नागरीकानी विरोध दर्शविला.यावेळी बोलताना शेडगे यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयातर्फे रत्नागिरीतील विमान तळावर नागरी वाहतूक विमान सेवा सुरू करण्यात येणार आहे. यासाठी विमानतळाचे विस्तारीकरण करणे क्रमप्राप्त आहे. या विस्तारीकरणात मिरजोळे आणि शिरगाव येथील जमीन ताब्यात घेतली जाणार आहे. सध्या गुगल मॅपवरून विमानतळाचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला असून, लवकरच त्याठिकाणी जाऊन क्षेत्र निश्चितीसाठी संयुक्त मोजणी करण्यात येणार आहे. भूसंपादनच्या 2013 कायद्यांतर्गत भूसंपादन करण्यात येणार असून ज्या दिवशी खरेदीखत होईल त्या दिवशीच्या रेडीरेकनर दराच्या पाच पट अधिक मोबदला जमीन मालकाला देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.ग्रा.प.सरपंच गजानन गुरव यांनी सांगितले की, वितानतळासाठी जाणार्या जागेत ग्रामस्थांनी घरे बांधली आहेत. जर त्यांच्या जमीनी ताब्यात घेतल्या तर हे ग्रामस्थ विस्थापित होतील. त्यांच्या निवासाचा प्रश्न उद्भवेल. त्यामुळे आमचा जमीन संपादन करण्याला ठाम विरोध आहे. यावेळी उपस्थित ग्रामस्थानींही आपले म्हणणे प्रशासनापुढे मांडले.















